सरुड : भारतीय शेतकरी कामगार पक्ष प्रणित शेतकरी सभेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाई भारत रंगराव पाटील-वडगांवकर यांची निवड झाली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या १९ व्या अधिवेशनात त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, करवीरचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर घटकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
भाई भारत पाटील हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार रंगराव पाटील-वडगांवकर यांचे पुत्र आहेत. शेकापशी प्रारंभापासून एकनिष्ठ असणाऱ्या घराण्यातील भारत पाटील यांनी आजवर पक्षाची स्थानिक पातळीपासून राज्यपातळीवरची अनेक पदे भूषविली आहेत. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आदी श्रमजीवी घटकांच्या न्यायहक्कांसाठी नेहमीच रस्त्यावरचा आवाज उठविणारे आणि जिल्ह्यातील तत्सम चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून भारत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या १९ व्या अधिवेशनादरम्यान पाटील यांनी आपली भूमिका मांडताना मंडल आयोग, कोल्हापूर रेल्वे विस्तारीकरण, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यावर ओढवलेली पूर परिस्थिती तसेच कोल्हापूरच्या संदर्भात अनेक विषयाशी संबंधित ठराव मांडले.