Bendur Utsav in Kaulav Radhanagri
कौलव: ग्लोबल युगात खेड्यांचे होणारे शहरीकरण व बैलांची घटणारी संख्या या पार्श्वभूमीवर आज (दि.१२) बेंदूर सणानिमित्त मानाच्या बैलाद्वारे कर तोडण्याचा थरार रंगला. ग्रामीण कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेला बेंदूर सण आज मोठ्या उत्साहात साजरा झाला.
बेंदूर किंवा बैलपोळा हा सण वर्षभर कष्टाचे जोखड ओढणाऱ्या बैलाच्या पूजेचा सण म्हणून ओळखला जातो. पहाटेच्या प्रहरी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवून अंगावर झुला टाकून त्यांची पूजा करण्यात आली. काही ठिकाणी बैलांची मिरवणूक ही काढण्यात आली. सध्या पेरणीची घाई असतानाही अनेक गावात कर तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागात आज ही मानाच्या पाटीलकीला प्रतिष्ठा आहे. दरवर्षी पाटीलकी बदलली जाते. बेंदूर सणादिवशी मानाच्या पाटलाचा बैल मानाची कर तोडत असतो.
बैलांची संख्या घटल्यामुळे काही ठिकाणी बाहेर गावावरून कर तोडण्यासाठी बैल आणण्यात आले होते. कौलव येथे आबा पाटील घराण्याकडे पाटीलकीचा मान आहे. भर पावसात वाद्यांच्या गजरात व शेकडो शौकीनांच्या उपस्थितीत मानाची कर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पिंजर व पिंपळाची पाने घालून लांबलचक कर तयार केली जाते. सजवलेला मानाचा बैल त्यावरून उडी टाकून कर तोडतो. यालाच कर तोडण्याची परंपरा म्हटली जाते. ग्लोबल युगात ग्रामीण भागात अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र, अनेक धार्मिक व सामाजिक रूढी परंपरा आजही अबाधित आहेत, त्याचेच हे प्रतीक आहे.