Balumama Bhandara Yatra 2026
मुदाळतिट्टा : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
सोमवार (दि. ९ मार्च) रोजी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन, अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भंडारा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी हरीभजन, धनगरी ढोल वादन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाळूमामांची आरती करण्यात आली तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, कळस तसेच भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
यावेळी देवालय समितीचे कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, सचिव रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजीत खर्डेकर, रामणा मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमाणा मासरेडी यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.