Aurangzeb Kadvi River History
विशाळगड : कडवी नदीने मुघल बादशाह औरंगजेब आणि त्याच्या फौजेला १० जुलै १७०२ रोजी रोखून धरले होते. या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ आज (दि. १०) मानोली येथे 'कडवी नदी शौर्यगाथा' दिन साजरा करण्यात आला.
सत्यशोधक इतिहास व कला अकादमी, कडवी नदी संवर्धन समिती आणि श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड यांच्या संयुक्त विद्यमाने कडवी नदीच्या उगमस्थळी हा शौर्य दिन साजरा झाला. यावेळी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले. तर माजी उपसभापती बाळासाहेब गद्रे, प्रा. प्रकाश नाईक आणि प्रगत शेतकरी ॲड. अरविंद कल्याणकर यांच्या हस्ते पणत्या प्रवाहीत करून जलप्रवाहाचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात कडवी नदी संवर्धन समितीचे समन्वयक राजेंद्र लाड यांनी या दिवसाचे महत्त्व विशद केले. प्रा. प्रकाश नाईक यांनी शिवकालीन इतिहासातील आंबा-मानोली परिसरातील या अपरिचित प्रसंगाची माहिती नव्या पिढीला दिली. औरंगजेबाने कडवी नदीला 'करोधी', 'कावडी' आणि 'काडवी' असे संबोधले होते. मुघल इतिहासकारांनीही ९ आणि १० जून रोजी कडवी नदीमुळे मुघल सैन्याला झालेल्या त्रासाचे आणि औरंगजेबाला झालेल्या मनस्तापाचे वर्णन केले आहे.
किल्ले विशाळगडच्या स्वारीवर आलेल्या औरंगजेबाला मुसळधार पावसामुळे मिरजेकडे परतावे लागले. यावेळी मानोली येथील दुथडी भरून वाहणाऱ्या कडवी नदीने त्याच्या वाट अडवली. नदी पार करताना तीस हजार अश्रफी (मुद्रा) वाहून गेल्या, उंट आणि हत्ती गाळात रुतले, तर अंबारीसह बादशाह स्वतःही कोसळला. वादळी पावसात औरंगजेबाचा शामियानाही कोसळला. निसर्गाच्या या रौद्र रूपाने मुघल सैन्याची दाणादाण उडवली. विशाळगडचे जंगल पार करायला त्यांना दहा दिवस लागले आणि या दरम्यान औरंगजेबाचा नातेवाईक व सेनापती सैय्यद अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाला.
या प्रसंगातून शिवरायांच्या युद्धकलेतील गनिमी काव्याचा अनुभव त्यांच्या पश्चातही कडवी नदीच्या रूपाने औरंगजेबाला आला, असे प्रा. सुहास नाईक यांनी नमूद केले. पावनखिंडच्या रणसंग्रामाप्रमाणेच या अपरिचित इतिहासाची नोंद राष्ट्रीय स्तरावर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केर्ले गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश पाटील, मुख्याध्यापक अशोक मोरे, केंद्रप्रमुख प्रकाश काळे, पदवीधर शिक्षक संभाजी लोहार, दत्ता दळवी, सरपंच पिंटू पाटील, दत्तात्रय भोसले, पवन सावेकर, प्रा. अमर पाटील, महेश कोळापटे, सिध्दी लाड आदी मान्यवर उपस्थित होते. संभाजी लोहार यांनी कडवी नदी संवर्धन प्रतिज्ञा सादर केली, तर अध्यापक दीपक साठे यांनी आभार मानले.