Asaduddin Owaisi Kolhapur Visit
असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ओवैसींच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्रमक विरोध करत आंदोलन केले आहे. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या ओवैसींना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्याची मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे. ओवैसींसोबत एमआयएमचे नेते इमतियाज जलील (Imtiaz Jaleel) हे देखील कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ ओवैसीच नव्हे, तर इमतियाज जलील यांनाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी घालावी अशी मागणी केली होती. जर या नेत्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी परवानगी दिली गेली, तर बिंदू चौकातील पंचमुखी मारुती मंदिराच्या ठिकाणी एकत्र येऊन महाारती करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता.
ओवैसींच्या विरोधामध्ये असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आले होते. आंदोलकांच्या मते, ओवैसींचा इतिहास पाहता ते कायम देव, देश, आणि धर्माच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत असतात. त्यांची "15 मिनिटात पोलीस हटवा आम्ही बघून घेतो" अशा स्वरूपाची वक्तव्ये प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे शाहू महाराजांच्या विचारांचे पालन करणारे शहर असून, येथे अशा पिल्लावळांना इथं थारा नसावा.
विशेष म्हणजे, केवळ हिंदुत्ववादी संघटनाच नव्हे, तर स्थानिक मुसलमानांनी सुद्धा ओवैसींच्या दौऱ्याला विरोध केलेला आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
ओवैसींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएम (MIM) पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन काल कोल्हापुरातल्या बागल चौक या ठिकाणी होणार होते. मात्र, हे कार्यालय अनधिकृत जागेवर बनवण्यात आले आहे, अशी माहिती हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेला पत्र देऊन दिली. या माहितीनंतर महानगरपालिकेने तात्काळ या जागेवर असलेले कार्यालय बंद करण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाने आपल्या मागणीला यश दिले असून, त्यांचे कार्यालय इथे बंदी करण्यात आले आहे. महानगरपालिकेने ते कार्यालय बंद करून सील केलेला आहे, अशी माहिती आंदोलकांनी दिली आणि या कारवाईवर समाधान व्यक्त केले .