Gaganbawda Highway 
कोल्हापूर

Gaganbawda Highway | महामार्गासाठी सुमारे 603 वृक्षांची कत्तल

Gaganbawda Highway | अजून १,६४१ झाडांवर कुऱ्हाड, हिरवाईचा बळी; पर्यावरणाची हानी भरून निघणार कशी?

पुढारी वृत्तसेवा

साळवण : उत्तम पाटील
महामार्गाच्या रुंदीकरणातून विकासाचा वेग वाढणार असला, तरी त्यासाठी गगनबावड्याला हिरवाईची मोठी किंमत मोजावी लागत आहे. कोल्हापूर - गगनबावडा - तळेरे महामार्गाच्या आसगाव ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्यात खुडवे ते निवडे दरम्यान ६०३ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

निवडे ते गगनबावडा दरम्यान आणखी १ हजार ६४१ वृक्षांवर कुऱ्हाड चालणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक हिरवाई, रस्त्यावरील सावली आणि जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांविषयी चिंता व्यक्त होत आहे.

गगनबावडा परिसर हा निसर्गसौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाईसाठी ओळखला जातो. महामार्गाच्या दुतर्फा वर्षानुवर्षे डोलदार वाढलेल्या वृक्षामुळे प्रवाशांना सावली तसेच पक्ष्यांसह विविध जीवांना अधिवास उपलब्ध होत होता. मात्र, रुंदीकरणाच्या कामामुळे या वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

विकासासाठी महत्त्वाचे असले, तरी निसर्गाच्या हानीची भरपाई केवळ वृक्षलालगवडीच्या आकड्यांपुरती मर्यादित राहणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. खूडवे ते निवडे दरम्यान तोडण्यात आलेल्या ६०३ वृक्षांमध्ये आंबा १३८, जांभूळ १६, औषधी हिरडा पाच आणि अन्य प्रजातींच्या ४४४ वृक्षांचा समावेश आहे.

या वृक्षांच्या बदलात ४८८ फळझाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, जुन्या वृक्षांची जागा घेण्यासाठी लावलेल्या रोपांना मोठे होण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
तोडलेल्या वृक्षांच्या बदलात फळझाडांची लागवड करण्याचे नियोजन असले, तरी या उपक्रमाचे अस्तित्व रोपांच्या प्रत्यक्ष जगण्यावर अवलंबून राहणार आहे.

वृक्षलागवड करणे ही पहिली पायरी आहे; त्यानंतर रोपांना नियमित पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या कामाची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर असणार आहे. येत्या पावसाळ्यात या रोपांची लागवड केली जाणार आहे. या रोपांपैकी किती रोपे जगली, त्यांची वाढ कशी होत आहे आणि मृत झालेल्या रोपांच्या जागी नव्याने लागवड केली जाते का, यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

निवडे ते गगनबावडा या टप्प्यातील नियोजित वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे ठिकाणी वृक्षतोड टाळण्यासाठी पर्यायी उपाय तपासण्याची गरज आहे. तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी वृक्षांचे पुनरोपण करता येईल का, तसेच स्थानिक परिस्थितीला अनुकूल प्रजातींची लागवड करून त्यांचे संगोपन कसे करता येईल, याचा विचार महत्त्वाचा ठरणार आहे.

महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुलभ होईल; मात्र, या प्रवासात रस्त्याकडील हिरवाई हरवली, तर विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षीत करता येणार नाही.

त्यामुळे वृक्षतोडीची अधिकृत आकडेवारी, भरपाई वृक्षलालगवडीची अंमलबजावणी आणि रोपांच्या संगोपनावर होणारी देखरेख याबाबत संबंधित यंत्रणांनी पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. महामार्गाचा विकास आणि गगनबावड्याचे निसर्गवैभव यांचा समतोल राखणे, हेच आता खरे आव्हान असणार आहे.

वृक्ष आच्छादन कमी झाल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कमीत कमी झाडे तोडली जातील याचा विचार करून विकास करणे गरजेचे आहे. विकास हा पर्यावरणपूरक शाश्वत विकास व्हायला हवा. वृक्ष पुनरोपण करायचे असल्यास शास्त्रीय पद्धत वापरावी.
— डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ज्ञ
वृक्षतोडीचा निर्णय घेताना त्याची गरज, उपलब्ध पर्याय आणि भविष्यातील परिणाम यांची सार्वजनिक स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे.
— अनिल पडवळ, मांडुकली
महामार्ग रुंदीकरणामध्ये जेवढी झाडे वाचविता येतील, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार यांना करण्यात आल्या आहेत.
— संतोष रासने, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT