Shahuwadi Police Station File Photo
कोल्हापूर

Kolhapur Anuskura Land Fraud: अनुस्कूरातील जमीन खरेदी प्रकरणात बनावट शिक्के, खोट्या सह्यांचा वापर; आठ जणांवर गुन्हा दाखल

वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित केल्याचा बनावट आदेश तयार करून त्यावर खोटे शिक्के आणि सह्या करून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Anuskura Land Fraud:

बांबवडे : वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरित केल्याचा बनावट आदेश तयार करून त्यावर खोटे शिक्के आणि सह्या करून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याप्रकरणी टेकोली, सांबू व पारगाव येथील आठ जणांविरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करंजफेणचे मंडल अधिकारी बाळू यमाजी कोथरे यांनी शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुस्कूरा येथील गट क्रमांक १८६ मधील १४.६५ आर जमीन वर्ग दोनची आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणी अक्षय पाटील (टेकोली), युवराज कांबळे (मलकापूर), शाहू धोंडी कांबळे (अनुस्कूरा), शिवाजी उर्फ शिवराम धोंडी कांबळे (अनुस्कूरा), परशुराम दादू लोखंडे (पारगाव, ता. हातकणंगले), सतीश बंडू सुतार, अमित शामराव पाटील आणि सर्जेराव महिपती सुतार (ता. शाहूवाडी) या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ग दोनच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानंतरच खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊन पुढील नोंद ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र, असा कोणताही अधिकृत आदेश नसताना बनावट आदेश तयार करून त्यावर शिक्के आणि खोट्या सह्या करण्यात आल्या. त्याआधारे करंजफेण येथील खातेदार शाहू कांबळे आणि शिवाजी कांबळे यांनी परशुराम दादू लोखंडे (पारगाव), सतीश सुतार, अमित पाटील आणि सर्जेराव सुतार (सांबू) यांना जमीन विकली.

या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सुनील कुंभार (पडळ) यांनी ३० सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी, पन्हाळा कार्यालयाकडे अर्जाद्वारे केली होती. या चौकशीअंती संबंधित जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार बनावट शिक्के तयार करून करण्यात आल्याचे उघड झाले. याबाबत खातेदारांकडे चौकशी केली असता, संबंधित जमिनीची खरेदी अक्षय पाटील आणि युवराज कांबळे यांनी करून दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांना तीन लाख रुपये दिल्याचेही खातेदारांनी स्पष्ट केले.

या व्यवहारात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर झाल्याची खात्री पटल्यानंतर उपविभागीय अधिकारी, पन्हाळा यांच्या आदेशानुसार आठ जणांविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT