कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा पुन्हा वित्त व नियोजन विभागाला सादर करण्यात आला आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या आराखड्यात नियोजन विभागाने सुचवलेल्या त्रुटी पूर्ण करून आराखडा फेर सादर केल्याचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी सांगितले.
श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. भाविकांनी पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता याव्यात याकरिता अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला. सुमारे १४०० कोटी रुपयांचा हा आराखडा राज्याच्या वित्त व नियोजन विभागाला सादर केला होता.
वित्त व नियोजन विभागाने यामध्ये काही त्रुटी काढल्या होत्या त्या दुरुस्त करून आराखडा पुन्हा सादर करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन आराखड्यातील त्रुटी दूर करून वित्त व नियोजन विभागाच्या सूचनेप्रमाणे त्यात दुरुस्ती करत हा आराखडा पुन्हा सादर करण्यात आल्याचे येडगे यांनी सांगितले.वित्त व नियोजन विभागाकडून आराखडा राज्याच्या उच्च अधिकार समिती पुढे जाणार असून त्यांच्या मान्यतेनंतर तो राज्य मंत्री मंडळासमोरही मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
राजाराम तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या कन्व्हेंशन सेंटरमुळे नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. विमानतळापासून तसेच राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिषदा, मोठे कार्यक्रम येथे होऊ शकतात. यामध्ये शहराची गरज असणारे दोन हजार आसन क्षमतेचे सभागृह देखील असणार आहे. याशिवाय छोटे सभागृह, अॅम्पी थिएटर असणार आहे. पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असणार आहे, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाचे काम गतीने सुरू आहे. यासाठी ४४ खांब लागणार असून काही खांब आले आहेत राहिलेले दोन, तीन दिवसांत येतील. त्यामुळे गरूड मंडपाचे काम लवकर पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.