

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर पुनर्विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असून त्यानंतर आराखड्याला गती येईल, असे जिल्ह्याचे पालक सचिव तथा नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले. राजाराम तलाव परिसरात उभारल्या जाणार्या कन्व्हेन्शन सेंटरच्या प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यात प्रारंभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
देवरा शुक्रवारी कोल्हापूर दौर्यावर आले होते. अंबाबाई मंदिर पुनर्विकास आराखड्याबाबत दर्शवलेल्या त्रुटी दूर करून पुन्हा सुधारित आराखडा सादर केला आहे. अर्थसंकल्पापूर्वी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर बैठक होणार आहे. ही बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे देवरा म्हणाले.
मंदिर परिसर पुनर्विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या विकासात भरच पडेल. भाविक, पर्यटकांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. याकरिता परिसरातील काही व्यापारी, नागरिक विस्थापित करावे लागतील. त्यासाठी संबंधित घटकांची सहमती आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने सकारात्मक प्रयत्न आवश्यक असल्याचे देवरा यांनी सांगितले. यातील अडथळे तातडीने दूर व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देवरा म्हणाले, राजाराम तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरू होईल. एप्रिलअखेर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी किमान फाऊंडेशन लेव्हल पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
कोल्हापूर शहराची 1946 पासून हद्दवाढ झालेली नाही. ती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याखेरीज शहराचा विकास होणार नाही. शहरालगतच्या भौगोलिक संलग्नता असलेल्या गावांचा हद्दवाढीत समावेश करणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागाचाही विकास होणार आहे, असेही देवरा यांनी सांगितले.