कोल्हापूर : अस्ताला जाणारी केशरी सूर्यकिरणे दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या कानापर्यंत पोहोचली. अंबाबाई मंदिराच्या स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य असलेल्या किरणोत्सवाने देवीचा गाभारा उजळून गेला. 11 नोव्हेंबरपर्यंत किरणोत्सव सोहळा सुरू राहणार आहे.
उत्तरायन आणि दक्षिणायन अशा दोन कालखंडात अंबाबाई मंदिरात किरणोत्सव होतो. मावळतीची सूर्यकिरणे थेट अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात. पहिल्या दिवशी चरणस्पर्श, दुसर्या दिवशी कंबरेपर्यंत, तर तिसर्या दिवशी मुखावर किरणे पोहोचतात. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी होते. यंदाच्या दक्षिणायण किरणोत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांपासून किरणोत्सवातील अडथळ्यांची पाहणी व हवामानाची चाचणी घेण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, रविवारी सायंकाळी सूर्यास्ताची किरणे अंबाबाईच्या कानांना स्पर्श करत लुप्त होताच उजळलेल्या गाभार्यात घंटानाद करण्यात आला. सायंकाळी पाच वाजल्यापासून किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली. किरणांची प्रखरता चांगली होती. सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी किरणांनी महाद्वारातून गरुड मंडपाच्या दिशेने प्रवेश केला. गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरा, संगमरवरी पायरी असे टप्पे ओलांडत किरणांनी 5 वाजून 40 मिनिटांनी अंबाबाईच्या गाभार्याच्या पहिल्या पायरीला स्पर्श केला. किरणांची सोनेरी झाक त्यांच्या प्रखरतेची पावती देत होती.
किरणे देवीच्या चरणांकडे जात असताना पेटी चौक व गाभार्यातील दिवे मालवण्यात आले. 5 वाजून 42 मिनिटांनी अंबाबाईच्या चरणांना किरणांचा स्पर्श होताच भाविकांनी अंबाबाईचा गजर केला. घंटानाद करण्यात आला. पावणेसहा वाजता किरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली, तर 5 वाजून 47 मिनिटांनी देवीच्या डाव्या कानांना किरणांचा स्पर्श झाला आणि डावीकडे झुकली. किरणोत्सव सोहळा पूर्ण होताच अंबाबाईची आरती करण्यात आली. संपूर्ण किरणोत्सव मंदिर परिसरातील स्क्रिनवरही भाविकांनी पाहिला.
रविवारी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. काही पर्यटकांना या सोहळ्याबाबत निश्चित माहिती नव्हती; मात्र किरणोत्सवाचे वैशिष्ट्य समजताच पर्यटक, भाविकांनी मंदिराच्या गणपती चौकातून किरणोत्सव सोहळ्यापूर्वी मावळतीच्या किरणांचा गाभार्यापर्यंतचा प्रवास पाहिला. या अनोख्या क्षणाचे साक्षीदार झालेल्या भाविकांनी किरणोत्सवानंतर अंबाबाईचा जयघोष केला.