कोल्हापूर : सुनील कदम
जिल्ह्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना लागलेल्या भेसळीच्या भयावह विरजणामुळे नागरिकांच्या ‘आरोग्याचे पार दही’ होताना दिसत आहे; पण अन्न-औषध प्रशासनाची ‘पाचही बोटे तुपात’ न्हाऊन निघत असल्यामुळे दिवसेंदिवस दूध जास्तच नासत चालले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोण, कशासाठी आणि कशाची भेसळ करेल याची शाश्वती राहिलेली नाही. ग्रामीण भागात मिळणारे घरगुती रतिबाचे दूध सोडले तर शुद्ध दूध मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे. रतिबाच्या दुधातही काहीवेळा पाणी मिसळलेले दिसून येतेच. गायी-म्हशींच्या कासेतून बाहेर पडल्यानंतर त्या दुधात कशाकशाची भेसळ होईल, याचा अंदाज लावणे कठीण होऊन बसले आहे. दुधाचे फॅट वाढविण्यासाठी अनेक वेळा दूध उत्पादक किंवा गवळी मंडळी त्यात चक्क युरिया आणि सॅकरीनसारखी रसायने टाकताना दिसतात. असे दूध दूध संघांमध्ये गेल्यानंतर तिथली मंडळी या दुधातील झाडून सगळा स्निग्धांश काढून घेऊन दूध म्हणून पांढर्या रंगाचे पाचकळ पाणी ग्राहकांच्या माथी मारतात. याशिवाय गोडेतेल आणि आंघोळीच्या शॅम्पूचा वापर करून बनविण्यात येणार्या बनावट दुधाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
दुग्धजन्य पदार्थांतील भेसळही अनेक प्रकारची आहे. साजूक तुपात चक्क गव्हाचा किंवा तांदळाचा रवा मिसळला जात आहे. लोण्यात डालडा मिसळून विकला जात आहे. मलईदार लस्सी म्हणून बाजारात मिरवणार्या अनेक लस्सींमध्ये तांदळाचे पीठ मिसळले जात आहे. दह्यामध्ये गवारीची पावडर, तर ताकाची चव चांंगली लागण्यासाठी त्यामध्ये भलती-सलती रसायने मिसळण्याचे उद्योग केले जात आहेत. श्रीखंड, आम्रखंड अशा पदार्थांमध्ये तांदळाचे पीठ आढळून येताना दिसत आहे. खव्यामध्येही पिठीसाखर आणि तांदळाचे पीठ मिसळले जाताना दिसत आहे. चारी बाजूने अशा पद्धतीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळीमुळे नासले जात असताना, अन्न-औषध प्रशासन मात्र केवळ ‘मलईवर डोळा’ ठेवून गप्पगार असल्याचे दिसत आहे.
डालडामिक्स आईस्क्रीम हा भेसळ बाजारातील एक भलताच प्रकार आहे. दुधाच्या शुद्ध मलईपासून बनविलेले आईस्क्रीम आणि डालडामिक्स आईस्क्रीम हे सहजासहजी ओळखू येत नसल्याने अनेक बाजारू आणि बनावट कंपन्यांनी बाजारात डालडामिक्स आईस्क्रीमचा रतीब घालायला सुरू केल्याचे दिसत आहे. खर्या दूध मलईपासून बनविलेली आईस्क्रीम फार फार तर आठ-दहा दिवस टिकू शकतात. तसेच अशा आईस्क्रीमसाठी वीजपुरवठ्याची अखंडित सोय असावी लागते. वीजपुरवठा खंडित झाला, तर दुधापासून बनलेले आईस्क्रीम काही वेळातच बाद होऊन जाते. शिवाय, अशा आईस्क्रीमची वाहतूकसुद्धा वातानुकूलीत वाहनांतूनच करावी लागते.
या सगळ्यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांत काही बाजारू आणि बनावट कंपन्यांनी बाजारात बनावट आईस्क्रीमचा पुरवठा करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. यापैकी किती कंपन्या नोंदणीकृत आणि किती कंपन्या बेकायदेशीर याचा सर्वसामान्यांना थांगपत्तासुद्धा नाही; पण अन्न-औषधच्या अधिकारी, कर्मचार्यांना मात्र अशा कंपन्यांची इत्थंभूत माहिती असलेली दिसते; पण त्यावर कारवाया होताना दिसत नाहीत. सर्वसामान्य तापमानातही डालडामिक्स आईस्क्रीम महिनोन्महिने टिकत असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही अशा आईस्क्रीमची चांगलीच चलती दिसून येत आहे. आईस्क्रीम म्हणून जर कोणतीही प्रक्रिया न केलेला डालडा जर मानवी शरीरात जात असेल, तर त्याचे काय भयावह परिणाम होत असतील ते सांगायला नको. वाढीस लागलेले हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा व अन्य काही आजार ही डालडामिक्स आईस्क्रीमचीच देणगी आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये प्रामुख्याने तरुणांमध्ये आणि काही प्रमाणात लहान मुलांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण बळावताना दिसत आहे. तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये प्रमाणापेक्षा भलताच लठ्ठपणा, पोटाचे भलतेसलते विकार, मधुमेह, श्वसनाचे विकार वाढत चाललेले दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश विकार हे डालडामिक्स आईस्क्रीममुळे उद्भवल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच सावध होण्याची वेळ आली आहे.