सर्व्हर डाऊनमुळे राज्यात रेशनवरील धान्य वितरण बंद. File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 91 हजार कार्डधारकांना जुलैचे धान्य नाही

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्व्हर डाऊनमुळे गेल्या आठ दिवसांपासून राज्यात रेशनवरील धान्य वितरण बंद झाले आहे. राज्यात तब्बल 61 लाख कार्डधारकांचे जुलै महिन्यातील धान्य अद्याप मिळालेले नाही. जिल्ह्यातील 91 हजार 667 कार्डधारक अद्याप या धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैचे धान्य ऑफलाईन पद्धतीने देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्याला लावलेल्या जाचक अटींमुळे दुकानदारांनी ऑफलाईन वितरण अद्याप सुरू केलेले नाही.

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर बंद आहे. अधूनमधून सर्व्हर सुरू होतो. पण त्याला अपेक्षित गती मिळत नसल्याने धान्य वितरणावर मोठा परिणाम झाला. एकीकडे पाऊस, पूरस्थिती आहे तर दुसरीकडे सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे नागरिकांना जुलै महिन्यात वेळेत धान्य मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. जुलै महिना संपला, आता ऑगस्ट महिन्याच्या धान्याचे वाटप सुरू झाले आहे. पण त्याकरिताही सर्व्हरला चांगली गती मिळत नसल्याने धान्य वितरण ठप्प आहे.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर 2018 पासून ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण केले जात आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करताना सातत्याने सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे धान्य वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व्हर कधी सुरू होईल आणि सुरू झालेला कधी बंद पडेल हे काहीच सांगता येत नाही. यामुळे रेशन धान्य दुकानांसमोर धान्यासाठी तासन्तास ताटकळत थांबलेल्या नागरिकांच्या रांगा राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहेत.

रेशन दुकानांत धान्यसाठा उपलब्ध आहे. पण त्याचे वितरण करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर अनेक तक्रारी होत आहेत. मात्र, त्याची दखल घेऊन उपाययोजना होत नसल्याचा आरोप रास्त भाव धान्य दुकानदार महासंघांकडून होत आहे. याबाबत 25 जुलै रोजी प्रधान सचिव यांच्यासमवेत बैठक झाली. मात्र, या बैठकीतही या अडचणींवर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे महासंघाने ई-पॉस मशिन परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी; मात्र जाचक अटी

दरम्यान, राज्य शासनाने जुलै महिन्याचे धान्य ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने आणि ऑगस्ट महिन्यात देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तलाठी, ग्रामसेवक यांना बोलावून घ्यायचे, त्यांच्यासमोर धान्य वाटप करायचे, त्याबरोबर प्रत्येक कार्डधारकाची सर्व माहिती लिहून ठेवायची आणि नंतर जेव्हा मशिन सुरू होईल त्यावेळी ही सर्व माहिती पुन्हा ई-पॉस मशिनवर भरायची आहे. ही सर्व माहिती कशी आणि कधीपर्यंत जपून ठेवायची, सर्व कार्डधारक एकाच वेळी येतील काय, असा प्रश्न दुकानदारांपुढे आहे. एकूणच ही ऑफलाईन वितरणाचीही प्रक्रियाही अडचणीची असल्याने बहुतांशी दुकानदारांनी ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण केलेले नाही.

जुलैचे धान्य ऑगस्टमध्ये ऑनलाईन देण्यास परवानगी द्यावी

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. काही लोक स्थलांतरितही झाले आहेत. यामुळे ऑफलाईन पद्धतीनेही त्यांना वेळेत धान्य घेण्यास अडचणी येत आहेत. ऑफलाईन वितरणासाठी लावलेल्या अटी अडचणीच्या आहेत. सध्या पूर पंचनाम्याची कामे सुरू आहेत. विविध योजनांची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत दररोज तलाठी, ग्रामसेवक रेशन दुकानात येऊन धान्य वाटपास उपस्थित राहतील, याचीही शक्यता कमी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जुलैचे धान्य ऑगस्टमध्ये ऑनलाईन देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT