नाशिक : नाशिकरोड येथील शहर धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. त्यामूळे सदर कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयातील नविन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
नाशिकरोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. रेशन कार्डधारकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पूरत्या स्वरुपात हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार संबंधित कार्यालयाचा कारभार आता जिल्ह्याच्या मुख्यालयातील नविन प्रशासकीय इमारतीमधून केला जाणार आहे.
लाभार्थींच्या सुविधेसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत नविन, दुय्यम शिधापत्रिका व विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज हे ऑनलाइन पद्धतीने rcms.mahafood.gov.in या प्रणालीतून public Login वरुन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रेशनकार्डवर नाव वाढविणे व कमी करणे, नावात बदल आणि दुरूस्ती करणे आदी कामेही ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामूळे सर्वसामान्यांना कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. याव्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने नाव वाढविणे, कमी करणे, बदल व दुरुस्तीचे कामकाज हे नव्याने स्थलांतरीत केलेल्या धान्य वितरण अधिकारी कार्यालयात केले जाईल, अशी माहिती धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी दिली आहे.
दिव्यांग लाभार्थींच्या मदतीसाठी धान्य वितरण अधिकारी कार्यालयातर्फे मदत कक्ष ऊभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयात हा कक्ष असणार आहे. दिव्यांग बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे, असे गणेश जाधव यांनी सांगितले.