कोल्हापूर ः कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणखी तब्बल 46 मोबाईल सापडले आहेत. याप्रकरणी तुरुंगाधिकारी अविनाश जयसिंग भोई (वय 42, रा. कारागृह क्वाटर्स, कळंबा) यांनी फिर्याद दिली आहे. कारागृह प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या झडतीत हे मोबाईल सापडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सर्व मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल सापडल्याने कळंबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कळंबा कारागृहाची सुरक्षा भेदून काही कैद्यांनी मोबाईल बाळगणे सुरू केले आहे. कारागृहात वरिष्ठांनी केलेल्या झाडाझडतीत ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर कारागृह प्रशासनाने अत्यंत कडक पहारा ठेवला होता. त्यानंतरही कैद्यांच्या बॅरेकमध्ये आणि इतरत्र मोबाईल आढळत असल्याने प्रशासनाच्या सुरक्षेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोबाईलबरोबरच गांजासारखे अमली पदार्थ, तर कारागृहात सर्रास मिळत असल्याची चर्चा आहे. कारागृह सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार धरून प्रशासनाने यापूर्वी 14 कर्मचार्यांना निलंबित केले आहे.
प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांच्याकडे सध्या कारागृहाचा पदभार आहे. त्यांच्यासह इतर अधिकारी दररोज कैद्यांच्या बॅरेकची तपासणी करत आहेत. कारागृहातील स्वच्छतागृह, सार्वजनिक स्नानगृह आदी ठिकाणी कैद्यांनी लपवून ठेवलेले 46 मोबाईल सापडले आहेत. मात्र, ते मोबाईल कोणत्या कैद्यांचे आहेत? ते स्पष्ट झालेले नाहीत. सर्व मोबाईलची किंमत सुमारे 35 हजार इतकी आहे. पोलिसांना आता ते मोबाईल कुणाकुणाचे आहेत? याचा तपास करावा लागणार आहे.