Nandani Stone Pelting Case
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथे माधुरी हत्तीला वनतारा प्रकल्पात हलवण्याच्या निर्णयाला विरोध करताना झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३९ पैकी ३२ जणांना आज (दि. ४) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
नांदणी येथील ऐतिहासिक जैन मठातील माधुरी हत्तीला वनतारा प्रकल्पात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. माधुरी हत्तीला वनताराला घेऊन जात असताना जमावाने पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती. या घटनेत १४ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते. तसेच ७ शासकीय वाहनांचे नुकसान झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात ओळख पटलेल्या ३९ जणांसह अज्ञात १२५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या ३९ पैकी ३२ जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. माधुरी हत्तीला वनताराला हलवण्याच्या निर्णयाला नांदणी गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. गावकऱ्यांनी 'आमची माधुरी आम्हाला परत द्या' अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.