कोल्हापूर

Kolhapur News : शाहूवाडीत ‘कृषी’ची धुरा प्रभारींवर; २३ रिक्त पदे भरण्याची मागणी

अविनाश सुतार

: कृषी प्रधान देशात कृषी क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेला राज्याच्या कृषी विभागाच मनुष्यबळाचा तुटवडा आहे. परिणामी शेतीची आणि कृषी खात्याची अवस्था दयनीय झाली आहे. शाहूवाडीत 'कृषी' ची धुरा प्रभारींवर असून मंजूर ४७ पैकी २३ रिक्त पदांचे ग्रहण कृषी विभागाला लागले आहे. यात सर्वात जास्त कृषी सहाय्यक ३६ मंजूर पदांपैकी १९ पदे रिक्त असल्याने या शेती तंत्रज्ञानाची अवस्था ओठालाही नाही. पोटालाही नाही, अशी दयनीय झाल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात (Kolhapur News)  आहे.

आपला देश कृषी प्रधान असून ६५ टक्के लोक शेती व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंतर्गत कृषी कार्यालयाची निर्मिती केली. मात्र, ४७ पैकी २३ पदे रिक्त असल्याने कृषी योजनांवर अनिष्ट परिणाम झाल्याचे शाहूवाडी तालुक्यात दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. तालुका कृषी अधिकारी अभिजित धेडे यांची सोलापूरला बदली झाल्याने एक महिन्यापासून हे पद रिक्त आहे. हातकणंगले येथे कार्यरत असणाऱ्या अभिजित गडदे यांच्याकडे तालुक्याचा अतिरिक्त पदभार आहे. शासनाने पद भरतीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विविध सेवा कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाच्या या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला (Kolhapur News)  आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेता यावा, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे, याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून मिळते. सदर कार्यालय राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येते. या कार्यालयाचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी कार्यालय सध्यातरी अपवाद ठरले आहे. कार्यालयात तालुका कृषी अधिकारी (१), मंडल कृषी अधिकारी (२), कृषी अधिकारी (१), कृषी सहाय्यक (१९) असे एकूण २३ पदे रिक्त असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Kolhapur News : मागील अनेक वर्षांपासून पदे रिक्त

मागील अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असूनही जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. बरेच शेतकरी आता पारंपरिक पिके टाळून आधुनिकतेकडे वळले आहेत. अशा शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून तातडीने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. परंतु, रिक्त पदांमुळे प्रशासकीय गतिमानता रखडल्याचे दिसून येते.  पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पिके वाहून जाणे, जमीन खचणे, दरड कोसळणे असे प्रकार घडू शकतात. अशावेळी योग्य वेळेत पंचनामे पूर्ण होतील का? वंचित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत.  रिक्त पदांची मंजुरी घेऊन कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आल्या आहेत. रिक्त पदांमुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. भविष्यात रिक्त पदे भरल्यास कृषीच्या योजना चांगल्या प्रकारे राबविण्यास मदत होईल.

– अभिजित गडदे, अतिरिक्त तालुका कृषी अधिकारी

तालुक्यात मंजूर व रिक्त पदे अशी :

पद                                   मंजूर       रिक्त
तालुका कृषी अधिकारी          १            १
मंडल कृषी अधिकारी            ३            २
कृषी अधिकारी                     १            १
कृषी पर्यवेक्षक                      ६            ०
कृषी सहायक                      ३६          १९
एकूण                                 ४७          २३

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT