कणकवली : पुढारी वृत्तसेवा
मुंबई आणि मालवण येथील आपली दोन्ही घरे सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच बांधण्यात आली आहेत, आपलं काही बेकायदेशीर नाही. असं असतानाही केवळ सूडाच्या राजकारणातून तक्रारी केल्या जात आहेत. त्यांनी सुरुवात केली आहे तर शेवट मीच करणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला देतानाच माझा बंगला तोडण्याची हिम्मत कोणातच नाही. आपल्या मालवण येथील बंगल्याबाबत कोणतीही नोटीस आपल्याला मिळालेली नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना ना. राणे म्हणाले, हे होणारच होते, मंत्रिमंडाळातील आणखीही काहीजण आहेत, एकएकजण आत जाणार. ना.राणे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेने 2013 साली सर्व परवानग्या दिल्यानंतरच आपण रहायला गेलो. आता दहा वर्षांनंतर अमुक आहे तमुक आहे म्हणून तक्रारी करत आहेत. दिशा सालीयनच्या आई वडिलांनी आपल्या मुलीची नाहक बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे, याकडे ना. राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आम्ही काही तिची बदनामी केलेली नाही. त्या मारेकर्यांवर कारवाई व्हावी हाच आमचा हेतू आहे. तिच्या आईवडिलांना आता बोलण्यासाठी कोण प्रवृत्त करत आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे.
संजय राऊतांची मानसिक स्थिती चांगली नाही
भाजप विरोधात बोलणार्यांवर ईडीची कारवाई केली जाते, या संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत ना. राणे म्हणाले, राऊत यांना कोणी अॅथोराइज केले आहे का? त्यांनीच प्रेस घ्यावी, त्यांनीच बेजबाबदार बोलावं. मला तर वाटतं संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही,अशी टीका केली.