कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात 26 ऑगस्ट रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन शासनमान्य विद्यालयांना मान्यता देऊ नये, असा धोरणात्मक निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र ना.राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मत्स्य विद्यालयासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते.
धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांच्या मान्यता गरजेची होती. ही मान्यता मिळाली असून मत्स्य विद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येणार असून देवगड तालुक्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये होणार आहे. महाविद्यालय इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. महाविद्यालयामुळे पारंपरिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणार्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायविषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. देवगडसारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जात असल्याने खर्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय मिळणार आहे.