सिंधुदुर्ग

Vengurla Flood Alert | आडेली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Vengurla Flood Alert | नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : पुढारी वृत्तसेवा

आडेली धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। पावसाळी परिस्थिती असल्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे। त्यामुळे कामळेवीर ते मोचेमाडपर्यंत नदी किनाऱ्यालगत राहणारे ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे।

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-कामळेवीर कार्यक्षेत्रात शासनातर्फे कार्यान्वित आडेली-कामळेवीर धरणातून गुरुवारी प्रशासनामार्फत केलेल्या जाहीर आवाहनानंतर शुक्रवारी १० जुलैपासून दुपारी २ वा. पासून अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला यावेळी प्रशासनाने तातडीने राबविलेल्या यंत्रणेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

आडेली-कामळेवीर धरण कमकुवत होऊन धोकादायक बनले होते त्यामुळे पावसाळ्यात धरण फुटून अनर्थ होऊ नये म्हणून धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण करणे आवश्यक होते.

त्यामुळे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागामार्फत गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या कामास जलदगतीने सुरुवात करण्यात आली होती धरण कार्यक्षेत्रात शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या झालेल्या संयुक्तिक चर्चेअंती पाणीसाठ्यावर नियंत्रित व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शुक्रवार १० जुलैपासून आवश्यकतेनुसार सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या त्यानंतर शुक्रवारपासून यंत्रणेद्वारे काम सुरू ठेवून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे

पाटबंधारे विभाग कुडाळचे कार्यकारी अभियंता एस. एच. महाले, डेप्युटी इंजिनिअर एम. जी. डामरेकर, कनिष्ठ अभियंता एम. ए. आंदुर्लेकर, एस. एस. परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, माजी सदस्य विष्णू कोंडसकर, ग्रामस्थ गंगाधर गोवेकर, दाजी मांजरेकर, मयुरेश मांजरेकर, अनंत मांजरेकर, संतोष पेडणेकर, विष्णू कोंडसकर, रुपेश गवंडे आदींसह आडेली, कामळेवीर, झाराप कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते शासनामार्फत सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथील सिक्युरिटी गार्डही सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित होते

नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन:

आडेली धरणातील पाण्याचा विसर्ग तांत्रिक निकष, धरणातील पाण्याची पातळी, हवामानाचा अंदाज आणि धरण सुरक्षा मानकांचा विचार करून करण्यात येत आहे. विसर्गाची मात्रा आवश्यकतेनुसार वाढविणे किंवा कमी करणे परिस्थितीनुसार करण्यात येणार आहे.

धरणाची स्थिती व पाण्याची पातळी यावर जलसंपदा विभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व बाबींचे नियमित निरीक्षण केले जात आहे. सदर विसर्गामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कामळेवीर व आडेली गावातील सर्व नागरिकांनी, तसेच नदीकाठालगत राहणारे नागरिक, शेतकरी, मासेमारी करणारे, नदीपात्रातून ये-जा करणारे नागरिक यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT