वेंगुर्ले : स्वच्छ सर्वेक्षण व पर्यटनाच्या दृष्टीने वेंगुर्ला शहराची शोभा वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना ‘वेस्ट टू वंडर’ या संकल्पनेतून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत ई-कचरा, प्लास्टिक, लोखंडी स्क्रॅप, टाकाऊ साहित्य इत्यादी कचर्याचा उपयोग करून शहरातील मोक्याच्या 7 ठिकाणी 8 प्रतिकृती बसविण्यात आल्या आहेत.
या प्रतिकृतींमध्ये मासेमारी व्यवसायाचे प्रतीक असलेली होडी, समुद्रातील स्वच्छतेचे महत्व सांगणारा कासव, बागायती व निर्यातक्षम शेतीचे प्रतीक काजू फळ, राष्ट्रीय पक्षी मोर, आकाशात झेप घेणारा गरुड, प्राण्यांचा राजा सिंह तसेच आपण राहतो ती पृथ्वी अशा विविध प्राणी, पक्षी व प्रतीकात्मक साकारलेली शिल्पे समाविष्ट आहेत. या शिल्पांमुळे नागरिकांबरोबरच पर्यटकांनाही स्वच्छता व पुनर्वापराचा संदेश मिळणार असून शहराचे सौंदर्य वाढणार आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन पर बक्षीस योजनेतून वेस्ट वंडर या संकल्पने अंतर्गत कचर्यापासून साकारलेल्या प्रतिकृती या घोडेबाव गार्डनमध्ये मासा व कासव, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज समोर गरुड, वेंगुर्ला तालुका स्कूल नं. 1 समोर मोर, वेंगुर्ला पोलीस स्टेशन गेट बाहेर काजू, जुन्या निर्लेखित शिवाजी प्रागतीक शाळेच्या ठिकाणी पृथ्वी, जुना एसटी स्टँड गणपती मंदिर नजीक होडी, सुंदरभाटले साई मंगल कार्यालया ठिकाणी सिंह आदी प्रतिकृती बसवल्या आहेत.
‘वेस्ट टू वंडर’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत साकारलेल्या प्रतिकृतींचा लोकार्पण सोहळा 2 ऑक्टोबर गांधी जयंती रोजी होणार आहे. हा सोहळा शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा एक महत्त्वाचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली.