Vengurla Municipal Council (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Swachh Survekshan 2024-2025 | स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्लेे नगरपरिषदेचे यश

Vengurla Cleanliness Ranking | स्वच्छ सर्वेक्षण-2024 मध्ये कोकण विभागात प्रथम; राज्यामध्ये तिसरा तर देशात 15 वा क्रमांक,वेंगुर्ले शहरास जीएफसी 1 स्टार व ओडीएफ डबल प्लस

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण-2024 मध्ये 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक व राज्यामध्ये तिसरा क्रमांक तसेच देशात 15 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रामधील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 14 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. वेंगुर्ला शहरास जीएफसी 1 स्टार व ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत घरोघरी 100 टक्के विलगीकृत कचर्‍याचे संकलन केले जाते. या विलगीकृत कचर्‍याचे नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे विविध 27 प्रकारात वर्गीकरण केले जाते. संकलित ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते. सुक्या कचर्‍याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते. शहरातील गटारे, व्हाळी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरांमध्ये सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते.

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लावासीयांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे.
हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी, वेंगुर्ले न. प.

‘प्लास्टिक निर्मूलन पथक’ स्थापन

स्वच्छ सर्वेक्षण कालावधीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ‘प्लास्टिक निर्मूलन पथक’ स्थापन करून त्यांच्यामार्फत नियमितपणे सिंगलयुज प्लास्टिक वापरणार्‍या नागरिक व व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत माहिती फलक, भिंतीचित्रे, पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

शहरात नियमित स्वच्छता मोहीम

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नियमीतपणे शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या तसेच शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छता विषयक विविध प्रकारच्या स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध पदाधिकारी व नागरिक यांच्या सहाय्याने अनेक ठिकाणी साफसफाई करण्यात आली. तसेच नगरपरिषदेमार्फत दर महिन्याला मांडवी येथे कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT