वैभववाडी : विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. अक्षय अशोक काटे (25, रा. सडुरे -गावठाणवाडी) असे या मयत अविवाहित तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे घडली. वैभववाडी तालुक्यात गेल्या महिना दीड महिन्यातील जीवन संपवल्याची ही पाचवी घटना आहे. तरुणांमधील वाढत्या आत्महत्येचे प्रमाणाबाबत समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.
मयत अक्षय काटे यांनी 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या ती बाब लक्षात येताच, त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे दाखल करण्यात आले होते.
त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे 4 वा. च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यातील पाच तरुणांनी जीवन संपवले आहे. यातील चार तरुणांनी विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवले आहे. तर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशा प्रकारे तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे वाढलेले प्रमाणाबाबत समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.