मृत वृद्ध भास्कर रामचंद्र सरफरे (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Vaibhavwadi Flood Incident | शेतात जाताना पुराच्या पाण्याने केला वृद्धाचा घात

Kurul Village Flood | करूळ येथे पुराच्या पाण्यात गेला होता वाहून

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : करूळ येथे शेतात जात असताना नदीला आलेल्या पुरात वाहून वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला आहे. भास्कर रामचंद्र सरफरे (79, रा. करूळ-जामदारवाडी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

याबाबत त्यांचा मुलगा सत्यवान भास्कर सराफरे यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी पहाटेपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. मयत भास्कर सरफरे यांची शेती नदी पलीकडे आहे. ते शेतात काम करण्यासाठी नदी ओलांडून जात होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर घटनास्थळी दाखल झाले. पोलिस नाईक उद्धव साबळे, अजय बिलपे, सूरज पाटील, योगिता जाधव, जितेंद्र कोलते, दीपेश पानसे आदी पोलिस तसेच सह्याद्री जीव रक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील, राजेंद्र वारंग व इतर सदस्य घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ सत्यवान सरफरे, दिलीप सरफरे, रवींद्र सरफरे, सूरज शिंदे, बबन टक्के, दत्ताराम सरफरे, विष्णू सरफरे, अशोक सरफरे, श्रीधर चव्हाण, रेखा सरफरे, दिपाली जामदार आदी घटनास्थळी दाखल झाले. सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच रमेश पांचाळ, तलाठी नागेश्वर रामोड, पोलिसपाटील सचिन पाटील, उदय कदम आदी घटनास्थळी उपस्थित होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत भास्कर सरफरे यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, भावजय, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

वाहून गेलेल्या ठिकाणापासून 50 मीटर अंतरावर मृतदेह...

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. सह्याद्री जीव रक्षक ही घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या ठिकाणापासून 50 मीटर अंतरावर नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी त्यांचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT