नांदगाव : कासार्डे-विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक वळणावर ट्रक व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दुचाकीस्वार व सहप्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी दु. 3 वा. च्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे मार्गावर काहीकाळ एकेरी वाहतूक सुरू होती. देवगड-पाटगाव येथील सुधाकर सिताराम गुरव (40, रा. पाटगाव-गावठण) व अनंत बाबला गुरव (60, रा.पाटगाव-बाणेवाडी) हे दुचाकी घेऊन विजयदुर्ग - कासार्डे राज्यमार्गावरून तळेरे येथे कामानिमित्त येत होते. वेळगिवे येथील नागरी वळणावर त्यांची दुचाकी व समोरून फणसगावच्या दिशेने जाणार्या ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही साईटपट्टीवर जाऊन पडले. दोघांनाही ही गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळीवरून पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी कासार्डे प्रा. आ. केंद्राच्या येथील 108 रूग्णवाहीकेला पाचारण केले. रूग्णवाहीकेतील डॉक्टरनी दोघेही मृत असल्याचे सांगितले. यानंतर फणसगाव पोलीस पाटील स्वप्नील नारकर, पाटगाव सरपंच नीतेश गुरव, देवगड भाजपा मंडलाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, ग्रा.पं.सदस्य कृष्णकांत उर्फ बाबू आडिवरेकर, अॅड. अविनाश माणगांवकर, अॅड. सिध्देश माणगांवकर, जि. प. माजी सदस्य विष्णू घाडी आदीसह पाटगाव व फणसगाव परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाताची माहिती विजयदुर्ग पोलिसांना देण्यात आली. कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक घनश्याम आढाव, विजयदुर्गचे पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक संजय कातिवले, वाहतूक पोलीस विभागाच्या सहा. पोलीस उपनिरीक्षक वर्षा पवार, वाहतूक पोलीस आशिष जाधव, विक्रम कोयंडे आदी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मात्र पलायन केलेल्या ट्रक चालकास ताब्यात घेत नाही, तसेच जो पर्यंत ट्रक मालक घटनास्थळी येत नाही, मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. अखेर पोलीस व लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्या नंतर मृतदेह विच्छेदनासाठी कासार्डे प्रा. आ. केंद्रात आणण्यात आला. मृत सुधाकर गुरव यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण व अनंत गुरव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.
सुधाकर गुरव व अनंत गुरव हे दोघेही चांगले मित्र असल्याने कधीही कुठेही जाताना दोघे एकत्र जायचे. तसेच अनंत गुरव यांच्या घरी सुधाकर याची नेहमीच उठबस असायची. आजही हे जीगरी मित्र दुचाकीवरून तळेरे येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. आम्ही दोघेही एकत्र मरणार असे ते अनेकवेळा सांगायचे. दुर्देवाने त्यांचे हे बोल खरे ठरले.
विजयदुर्ग-कासार्डे राज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक होते. हे ट्रक नेहमीच भरधाव धावत असल्याच्या तक्रारी मार्गावरील गावातील ग्रामस्थांसह वाहन चालक यांच्या आहेत. आज या भरधाव वेगामुळे दोघांचा जीव गेल्याने ग्रातस्थांनी संताप व्यक्त केला. अपघातानतंर चिरे वाहतूक करणारे चालक अथवा मालक, खाण व्यावसायिक साधी विचारपूस करायला सुध्दा न आल्याची खंत ग्रामस्थांमधून व्यत होत होती.