

कणकवली ः जगण्यासाठी आवश्यक असणार्या मूलभूत कौशल्यांपैकी एक कौशल्य म्हणजे अर्थसाक्षरता. आपली आर्थिक गणिते सांभाळता येणारी, पैशांचे महत्त्व माहीत असणारी, पैशांचा आदर करणारी आणि त्यांची योग्य पद्धतीने जपणूक करणारी पुढील पिढी तयार करण्याच्या उद्देशाने बफे ग्रोथ पार्टनर्स या कंपनीमार्फत कोकणातील सुमारे 3 हजार शालेय विद्यार्थ्यांना रुचिरा सावंत आणि सानिका सावंत या सिंधुकन्यांकडून शाळाशाळांमध्ये जावून अर्थसाक्षरतेचे प्रशिक्षण दिले जात आहेत. वसई, मुंबई आणि कोकण भागातील जवळपास 5 हजार विद्यार्थ्यांचे या उपक्रमांतर्गत अधिकृत नोंदणी होऊन प्रशिक्षण झालेले आहे.
सिंधुदुर्गात 10 नोव्हेंबरपासून शाळाशाळांमध्ये जाऊन अर्थ साक्षरतेचे हे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना दिले जात आहे. यामध्ये शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, नरडवे इंग्लिश स्कूल, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे, सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, माध्यमिक विद्यालय उंबर्डे, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट, बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली, प्रगत विद्यामंदिर रामगड अशा 10 शाळांमधील 2900 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे
येत्या सोमवारपर्यंत माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी, छत्रपती कृषी महाविद्यालय ओरोस या शिक्षण संस्थांमध्येही हा उपक्रम राबवला जाणार आहे. जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. इ. 5 वीपासून पूढे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, त्यांच्या अवतीभवतीच्या उदाहरणांचा, दैनंदिन जीवनातील घटकांचा, सवयीचा दाखला देत पैसे म्हणजे काय, गुंतवणूकीचे योग्य मार्ग कोणते अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जात आहेत. हा अभ्यासक्रम वॉरन बफे यांच्या भारतातील मॅनेजर्सपैकी एक डॉ. प्रकाश जैन यांच्या पुढाकाराने तयार केला आहे. युरोपीयन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापिठाकडून हा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त असल्याचे रुचिरा सावंत, सानिका सावंत यांनी सांगितले.