विवेक गोगटे
आडेली : पूर्वीच्या काळी मुलीचे लग्न जमवताना मुलीकडची मंडळी व लग्न जमवणारे पुढारी वर्ग नवरदेवाच्या गुरांच्या गोठ्यात जाऊन बैलांची किती जोते आहेत हे निरखून पाहायचे. समजा दोन-तीन किंवा चार जोते म्हणजे आठ बैल असले तर तो मोठा श्रीमंत शेतकरी असे समजले जायचे. अशा शेतकर्यांच्या घरात मुलीची पाठवणी व्हायची. मात्र सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. पैशाने श्रीमंत असूनही अशा शेतकर्याच्या गोठ्यामध्ये दोन बैलांचे जोत (औत) दिसेनासे झाले आहे. परिणामी बैलजोडी आणि लाकडी नांगराच्या सहायाने शेत नांगरवणारा शेतकरी लवकरच केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की शेतकरी आपल्या शेती कामात व्यस्त होतात. कोकणातील शेतकरी हा प्रामुख्याने पावसाळ्यातील शेतीवरच अवलंबून असतो. ही शेती करण्यासाठी शेतकर्याला खर्या अर्थाने मदत होते ती बैलजोडीची. या बैल जोडीच्या सहायाने नांगरणी, चिखलणी, मळणी, मालवाहतूक आदी कामे केली जायची. मात्र सध्याच्या काळात बैलजोडीच्या वाढत्या किमतीमुळे तसेच त्यासाठी वर्षभर पालनपोषणासाठी येणारा खर्च, लागणारे मनुष्यबळ त्याचा ताळमेळ जुळत नसल्यामुळे सध्या शेतशिवारात बैलजोडीच्या सहायाने शेत नांगरवणारा शेतकरी इतिहास जमा होतो की काय, याची भीती वाटू लागली आहे.
दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे. खते, बियाणे औषधी याचा खर्च गगनाला भिडला असतानाच बैल जोड्यांच्या किंमतीही लाखाच्या घरात गेल्या असून तसेच वर्षभर पालन पोषण करणे परवडत नसल्याने सध्याची शेती बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने केली जात असल्याने बैलजोडींची संख्या कमी झाली आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असताना शेतात फेरफटका मारताना शेतकर्यांच्या बैल हाकण्याच्या हिरि...री.. पापारीचा... नाद हवेतच विरला असून त्या आवाजाऐवजी पॉवर ट्रीलरचा आवाज कानी घुमत आहे.
शेती-माती गुरांवर जीव लावणारी पिढी कमी होऊ लागली. शेती-जनावरे हीच आपली संपत्ती हा विचार काळासोबत मागे जाऊ लागला. आजच्या तरुण वर्गाला शेती व जनावरे सांभाळणे हे कमीपणाचे लक्षण वाटू लागले आहे. कुटुंबातील एक तरी व्यक्ती शहरात नोकरीसाठी जावा, अशी इच्छा गावातील प्रत्येकाच्या मनात वाढू लागल्यामुळे व शहरातील आकर्षणाला भुलल्यामुळे आपल्या गावाच्या शेती व जनावरांकडे बघण्याचा विचार कमी होऊ लागला. त्यातच पूर्वी असणारी एकत्रकुटुंब पद्धत दिवसेंदिवस विभक्त होऊ लागल्यामुळे पर्यायी गाई गुरांचे गोठे, त्यात असणारी जनावरे, जमीन जुमला यांच्याही वाटण्या झाल्या. जनावरे सांभाळण्यासाठी कोणीच वाली शिल्लक नसल्यामुळे काहींनी आपली जनावरे विकली तर काहींनी आर्थिक परिस्थितीमुळे विकल्याने सध्या गुरांचे वाडे हे खुराडे झाल्याचे दिसून येत आहेत.
बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची सगळी कामे करावी लागत असताना शेतकर्यांकडे लाकडापासून बनवलेला नांगर व त्यासंबंधी अवजारे असायची. कालांतरानी पारंपरिक पद्धतीने शेती करणे बंद होऊन ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीने शेती होऊ लागल्याने ग्रामीण भागातून परंपरागत वापरात असलेला लाकडी नांगर, ईशाड, जू, रुमडी, कवळी, डिमरी, दाता, गुठा, ढिपळो यासारखी लाकडी हत्यारे शेतातून कालबाह्य होऊ पाहत आहेत.
पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडू लागली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे कमी वेळेत व माफक दरात होऊ लागल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला बैलजोडीची आवड असूनही खिशाला परवडणारी नाही; मात्र बैलजोडी जुंपून केलेल्या शेतीतून जे समाधान मिळते ते समाधान या आजच्या यांत्रिकीकरणाच्या शेतीतून मिळत नाही.उदय शिरोडकर, शेतकरी