सगुण मातोंडकर
वेंगुर्ले : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने वेंगुर्ले तालुक्याच्या किनारपट्टीवर सागरी पर्यटनासाठी दाखल व्हायला सुरुवात झाले आहे. पर्यटनदृष्ट्या समृद्ध समुद्रकिनारे सदैव पर्यटकांना भुरळ घालत असल्यामुळे यावर्षीचा सागरी पर्यटनाचा हंगाम तेजीत सुरुवात झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागूनच असल्यामुळे वेंगुर्ले तालुक्याचे समुद्रकिनारे पर्यटनदृष्ट्या समृद्ध आहेत. गोवा राज्याच्या सीमेवरील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशी-विदेशी पर्यटक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर,सागर तीर्थ, सागरेश्वर, वेंगुर्ले बंदर, वायंगणी, खवणे, निवती या किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. तसेच रेडी येथील यशवंतगड, द्विभुज गणपती, शिरोडा मिठागर, वेंगुर्ले बंदर दीपगृह, डच वखार या ठिकाणी पर्यटक यायला सुरुवात झाली आहे.
गोव्याला भेट देणारे बहुतांश पर्यटक शिरोडा -वेळागर समुद्रकिनाऱ्याला आवर्जून पर्यटनासाठी येत आहेत. वेळागर समुद्रकिनाऱ्याला लाभलेली सुरूच्या झाडांची स्वच्छ आणि सुंदर बाग पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी सागरी पर्यटनासाठी येणारे पर्यटक समुद्र पर्यटऱ्यावर फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचे तुषार अंगावर घेऊन मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. गोवा राज्याच्या किनाऱ्यापेक्षाही अधिक मनमोहक असणारे वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत. या किनाऱ्याची भुरळ येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पडत असल्यामुळे नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सागरी पर्यटनासाठी दाखल झाले आहेत.
वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरीला पर्यटन निवासांचे आगाऊ बुकिंग फुल्ल झाले आहे. कोकणातील मत्स्यखाद्यसंस्कृतीचा घरगुती पद्धतीतील स्वाद घेण्यासाठी देश-विदेशी पर्यटककांची पसंती आहे. वेळागर समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग सफर करण्यासाठीही पर्यटकांची पसंती आहे.