आंबोली : पुढारी वृत्तसेवा
आंबोली वर्षा पर्यटनाची प्रचंड क्रेझ नेहमीच पर्यटकांमध्ये दिसते. मात्र काही अतिउत्साही पर्यटकांमुळे आंबोली पर्यटनाला डाग लागतो. रविवारी चौकुळ गावातील 'बाबा धबधब्या'वर जाणाऱ्या काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे चौकुळ-कुंभवडे रस्त्यावर केगदवाडी येथे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी गेलेल्या स्थानिक पोलिस पाटलांवरच या पर्यटकांनी कुऱ्हाड, लाकडी दांडा आदी हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी सोमवारी ग्रामपंचायत बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना रोखून प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. त्या पर्यटकांवर कारवाई व्हावी तसेच बाबा धबधबा अतिउत्साही पर्यटकांसाठी बंद ठेवण्याची मागणी केली.
बाबा धबधबा खाजगी मालकीचा असून ग्रामपंचायतीचे त्यावर नियंत्रण नाही. परिणामी नियोजन अभावी वाहतूक, गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न स्थानिकांसमोर उभा राहतो. रविवारी चौकुळ - केगदवाडी परिसरात अतिउत्साही, हुल्लडबाज, नशेबाज व गुंड पर्यटकांकडून झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी गेलेल्या केगदवाडीच्या पोलीस पाटलांवर काही गुंड पर्यटकांनी हत्यार उचलण्याचा प्रयत्न करत धमकावले. या गंभीर प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तर सदर घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी संतप्त स्थानिकांनी ग्रामपंचायत बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटनाच्या वाहनांना रोखून धरले. या संपूर्ण परिस्थितीत स्थानिक युवकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. युवकांनी एकजुटीने पुढाकार घेत परिस्थिती हाताळली, स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ठामपणे मांडला आणि बाबा धबधब्याच्या मालकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान स्थानिकांनी सध्याची परिस्थिती स्पष्ट करत बाबा धबधबा बंद ठेवण्याची मागणी केली.
स्थानिकांची भूमिका आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन धबधब्याच्या मालकांनी अनिश्चित काळासाठी धबधबा बंद ठेवण्याचे मान्य केले. सदर गंभीर प्रकाराची तत्काळ प्रशासनाने गंभीर दखल घेत त्या गुंडप्रवृत्तीच्या पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी आंबोली गणाचे पं. स. सदस्य मायकल डिसोजा यांनी केली आहे.