दोडामार्ग : तिलारी नदीपात्रात उभारलेला चौथरा वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मुळात हा चौथरा आहे की विहीर आहे? या बांधकामाला नदीपात्रात उभारण्याची परवानगी देता येते का? असेल तर ती कोणत्या विभागाने दिली? याबाबत तहसीलदार व तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांना विचारले असता त्यांनी काहीच कल्पना नसल्याचे सांगितले. त्यांच्या या उत्तराने आश्चर्य व्यक्त होत असून चौथर्याच्या कोसळलेल्या भागामुळे नदीप्रवाहाला अडथळा निर्माण होत पाणी लगतच्या जमिनीत घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा चौथरा अथवा विहीर नेमकी कशासाठी उभारली? असा सवाल उपस्थित होत आहे.
दोडामार्ग-वीजघर राज्य मार्गावरील तिलारी मिनी कॉलनी येथील पुलाजवळ तिलारी नदीपात्रात मागील काही दिवसांपासून एका चौथर्याचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून ते एखादे शासकीय काम असेल अशा चर्चा रंगू लागल्या. शिवाय जलसंपदा विभागाकडून नदीतील गाळ काढण्याचेही काम सुरू होते. त्यामुळे गाळ काढत असावेत असा कयासही बांधला गेला. पावसाळा आला अन् या कामाचा वेग वाढला. पावसाळ्यातही काम जोरदार सुरू होते.दरम्यान तालुक्यात रविवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी तिलारी नदीतील पाणी प्रवाह वाढला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीपात्रातील चौथर्याचा अर्धा भाग कोसळला.
या घटनेची माहिती तालुक्यात पसरली. मात्र एकाही विभागाचा अधिकारी अथवा तालुका आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी फिरकले नाही. याबाबत सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
या चौथर्याबाबत तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना विचारले असता, त्यांनी आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच याबाबत पूर्ण माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले. प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांना याबाबत विचारले असता त्यांनीही याबाबत काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चौथर्याच्या या कामाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.