दोडामार्ग : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. धरण 98.76 टक्के भरले असून पुन्हा एकदा धरणाचे सांडवे उघडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी दिला आहे.
तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग 2 जुलै 2025 रोजी सांडव्याद्वारे सुरू झाला होता. 23 सप्टेंबर रोजी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. धरणाची पाणी पातळी 112.36 मीटर इतकी झाली होती. मात्र त्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी सुरू झाली. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. परिणा 27 सप्टेंबर रोजी धरण 97.43 टक्के भरल्याने पाणी पातळी 112.45 मी व 435.892 द.ल.घ.मी. साठा झाला.
सद्यस्थितीत पावसाची रिपरिप सुरूच आहे. सोमवारी सकाळी 8 वा. धरण 98.76 टक्के भरून पाणी पातळी 112.82 मीटर व 481.804 द.ल.घ.मी. साठा झाला. म्हणजेच केवळ दोनदिवसांत 5.812 द.ल.घ.मी. साठ्याची भर पडलेली आहे. ही वाढ लक्षात घेता, 19 ऑक्टोबरपर्यंत नियोजित असलेले 100 टक्के पाणी पातळी यापूर्वीच गाठले जाण्याची शक्यता आहे.
तत्काल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जलसंपदा विभागाने खळग्यातील दगडी धरणाचे सांडवे येत्या 12 तासांत कधीही उघडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अतिरीक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे.
जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरू नये. रात्रीच्या वेळी नदी पार करू नये. कपडे धुण्यासाठी महिलांनी, गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतकर्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे व योग्य ती सावधानता बाळगावी. ग्रामस्थांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी केले आहे.