2013 पूर्वीच्या शिक्षकांना ‘टीईटी’ अन्यायकारक!  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Maharashtra Teachers TET Issue | 2013 पूर्वीच्या शिक्षकांना ‘टीईटी’ अन्यायकारक!

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या बैठकीत ठराव

पुढारी वृत्तसेवा

विजयदुर्ग : सन 2013 पूर्वी शिक्षक पदावर रुजू सर्व शिक्षक हे निवड मंडळ तथा समकक्ष परीक्षा देवून निवड झाली असल्याने या शिक्षकांना पुन्हा परीक्षेची सक्ती करणे अन्यायकार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी राज्यातील सर्व आमदार व सर्व खासदार यांना संघटनात्मक निवेदन देण्याचा निर्णय महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पनवेल येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेत घेण्यात आला.

राज्य नेते विजय भोगेकर यांच्या उपास्थितीत झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यध्यक्ष प्रसाद पाटील होते. विजय भोगेकर म्हणाले, शिक्षण व शिक्षक यांच्यावरील अन्यायकारक धोरणास कडाडून विरोध करण्यासाठी सर्वांनी संघटित राहणे आवश्यक असून जनसुरक्षा विधेयक समाजातील सर्वच घटकास घातक असलेले जनसुरक्षा विधेयक परतवून लावण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेत राज्य अधिवेशन बाबतचे सूक्ष्म नियोजन सभागृहात सांगितले.

शिक्षण सेवक पद रद्द करावे, अन्यायकारक संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा, जि. प. शाळांना 100 पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इ. 5 वी व 8 वी चे वर्ग विना अट जोडावेत, कार्यरत 100 टक्के विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, आधार व्हॅलीड न झालेले विद्यार्थी संच मान्यतेस ग्राह्य धरावेत, सर्वच कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नक्षलग्रस्त, आदिवासी भागात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करून थकबाकी आदा करावी, पदवीधर शिक्षकांमधून मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्यास वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, ऑनलाईन बदल्या जिल्हा स्तरावर व्हाव्यात, प्रति गणवेश निधी 500 रु. मिळावा, रजा रोखीकरण सर्व प्राथमिक शिक्षकांना लागू करावे, निवडश्रेणीमधील त्रुटी दूर करावी, आंतर जिल्हा टप्पा राबविण्यात यावा, केंद्रातील एकूण पटसंख्येवर केंद्रास कला, कार्यानुभव, शाररिक शिक्षण विषयास पद मंजूर व्हावे, जिल्हातंर्गत बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करावेत, स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी व लाईट बीलसाठी स्वतंत्र अनुदान द्यावे आदी मागण्याचे ठराव या सभेत संमत करण्यात आले.

अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व सरचिटणीस प्रकाश वाडकर यांनी दिली. स्वागत व प्रास्ताविक राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी केले. आभार विकास गायकवाड यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT