बांदा: मालवण ते गोवा जाणार्या टेम्पो ट्रॅव्हलरने इन्सुली -कोठावळेबांध येथे गोव्याला जाणार्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह तब्बल वीस महिला जखमी झाल्या असून त्यापैकी पाच जणींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जिल्हा रुणालय सिंधुदुर्गनगरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी 8.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली. मालवणमधील वडाचेपाट, मसुरे आदी परिसरातील महिला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे निघाल्या होत्या. इन्सुली येथील खालसा धाबा परिसरात कंटेनरने अचानक दिशा बदलल्याने टेम्पो ट्रॅव्हलर थेट कंटेनरला जाऊन धडकला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा पुढील भाग अक्षरशः लोळण घेऊन चेंगराचेंगरीसारखा झाला.
ट्रॅव्हलरमध्ये 20 महिला होत्या. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळ काढला. अपघाता झाल्यानंतर एक तासाने उशिरा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. अपघातातील किरकोळ जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी बांदा प्रा. आ. केंद्रात दाखल केले.
या अपघातात मंगल थोरात (वय 50), ललिता भोगले (25), पूर्वा पाटकर (30), स्पृहा माडये (28), स्वप्निल हडकर (27), प्रणाली धुरी (51), रसिका मालवणकर (40), विजया माळकर (54), मनाली भोगले (23), दीपिका आंबेकर (55), दिक्षिता परब (50), सुप्रिया परब (53), विजयश्री गिरकर (49), शुभदा नाईक (55), धनश्री राणे (53), सुप्रिया ठाकूर (59), प्रज्ञा जाधव (57), रोहिणी परब (38), क्रांती दळवी (22), दिव्या माधव (33), संचिता सावंत (50) हे जखमी झाले.