Widow custom 
सिंधुदुर्ग

Widow Customs Ban : कलमठ ग्रामपंचायतच्या विधवा प्रथा बंद निर्णयाची राज्य महिला आयोगाकडून दखल

अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT