मालवण : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. आठ राज्यातील सुमारे 1500 स्पर्धक या दोन दिवशीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटना अध्यक्ष श्रीकृष्ण (दीपक) परब व महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली.
रविवारी सकाळी 6 वा. स्पर्धाना सुरुवात होणार आहेत. तर दुपारी 1 वा. पासून चिवला बीच येथेच बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. रात्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष ही स्पर्धा होत असून स्थानिकांसह अनेक सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. मालवणच्या पर्यटन वाढीत या स्पर्धेचे योगदान मोठे आहे. या सागरी जलतरण स्पर्धेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. स्थानिकांकडून ही विविध ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकाचे व त्यांच्या कुटुंबीयांचे चांगले आदरातिथ्य केले जाते. दिव्यांग जलतरणपटूंना विशेष सहाय्य व प्रोत्साहन दिले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी संघटनेने खास सवलत दरात प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत.
2009 पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन होत आहे. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष स्पर्धा असून या स्पर्धेत 6 वर्ष वयापासून ते 75 वर्ष वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे. यावर्षी तर 4 वर्ष पासून 95 वर्ष वय पर्यत स्पर्धक सहभागी होणार आहेत. तीन पिढ्या मुलगा, वडील, आजोबा एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गेली तीन वर्ष पासून दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येणार आहे तसेच ग्रुपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू असणार आहेत. आठ राज्य मधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्हे यातील सुमारे 1500 स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी पूर्ण केली आहे.
ऑटोमेटिक टायमिंग सिस्टीम
आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटिक टायमिंग सिस्टीम टच पॅड वापरली जाणार आहे. स्पर्धकांकडे रिस्ट वॉच असेल. तो स्कॅन होईल. वेळ, नंबर त्यावर कळेल. एकूणच अधिक नवे बदल करून एक दर्जेदार असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.
असे असणार स्पर्धेचे स्वरूप
पहिला दिवस
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे 10 किमी. स्पर्धा व 1 किमी, 2 किमी फिन्स स्विमिंग स्पर्धा आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होणार आहे. त्या दिवशीचा पारितोषिक वितरण चिवला येथेच होईल होणार.
स्पर्धेचा दुसरा दिवस
स्पर्धच्या दुसर्या दिवशी सोमवार, 14 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जलतरण संघटना राज्यस्तरीय स्पर्धा 500 मिटर 1 किमी, 2 किमी, 3 किमी, 5 किमी या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार. त्याचे पारितोषिक वितरण होणार.