कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पिंगुळी - धुरीटेंबनगर येथील साई मंदिर समोर पणजी - पुणे एसटी बसने एका कारला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वा.च्या सुमारास घडली. या धडकेने सदर कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जात पलटी झाली. कार मध्ये चालक व चार महिला होत्या. सुदैवाने कार व बसमधील कुणालाही दुखापत झाली नाही. या दरम्यान, कुडाळच्या दिशेने जाणारा एक मोटरसायकलस्वार सुदैवाने बचावला. या अपघात प्रकरणी हयगयीने व अविचाराने वाहन चालवून कारमधील प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक विक्रांत विलास गायकवाड (रा. कागल, जि. कोल्हापूर) याच्यावर कुडाळ पोलिसांकात गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर आगाराची पणजी - पुणे बस सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होती. महामार्गावर पिंगुळी-धुरीटेंबनगर साई मंदिर समोर बांदा येथून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला मागून या बसने जोराची धडक दिली.यात कार रस्त्याच्या डाव्या बाजूला साधारण 40 फूट अंतरावर जात पलटी झाली. कारमध्ये चालक व चार महिला होत्या. कारचालकाला किरकोळ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी येथे धाव घेत सहकार्य केले.
कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. कुडाळ आगाराचे अधिकारी - कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. बसच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूचेही नुकसान झाले. कारला धडक दिल्यानंतर कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला कारला आदळणार होती. परंतु मोटारसायकलस्वाराच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. या घटनेची फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात अरविंद मधुकर माने (रा. सावंतवाडी) यांनी दिली. कार मधील जखमी प्रवाशांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.