सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल Pudhari Photo
सिंधुदुर्ग

प्रकाश बिडवलकर प्रकरणातील आरोपी सिध्देश शिरसाटविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव

Sindhudurg Police News | पोलीस अधीक्षक अगरवाल यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील प्रकाश बिडवलकर अपहरण व खून प्रकरणातील कुडाळ येथील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणातील चारही आरोपी दि.१३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. या गुन्हात अजुनही काहींचा सहभाग असुन त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी आज (दि.१२) पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान अवैद्य धंद्यात जिल्ह्यातील पोलिसांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्यास सुध्दा आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमधील पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवती पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी अगरवाल म्हणाले की, प्रकाश बिडवलकर याच्या अपहरण प्रकरणी सिद्धेश शिरसाट (रा.कुडाळ), गणेश नार्वेकर (रा.माणगाव), सर्वेश केतकर (रा. सातार्डा-सावंतवाडी) व अमोल शिरसाट (रा.कुडाळ) यांना अटक केली होती. त्यांना कुडाळ न्यायालयाने दि.१३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी आर्थिक कारणातून प्रकाशला कुडाळ मध्ये आणून मारहाण केली. त्यात त्यांचा अमोल शिरसाट यांच्या घरी मृत्यू झाला. त्यानंतर सार्तार्डा येथील जंगलातील स्मशानभूमीत मृतदेह जाळून राख तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सिंधुदुर्गात २५ ठिकाणी ड्रग्सचे सेवन

ड्रग्स प्रकरणात गोवा, बेळगाव, रत्नागिरी , कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आपल्या संपर्कात आहेत. ड्रग्सच्या गुन्ह्यातील जवळपास ५५ जण ज्यांनी महाराष्ट्र व गोवामध्ये गुन्हा केलेला आहे, ते आमच्या हिटलिस्टवर आहेत.

सिंधुदुर्गातील २५ ठिकाणी गांजाचे सेवन केले जात आहे. जिल्ह्यात ड्रग्स किंवा अमली पदार्थ विरोधात कारवाई केली जाईल. काही ड्रग्सच्या केसमध्ये स्थानिक आणि बाहेरच्या लोकांचा समावेश आहे. दोडामार्गमधील रबर प्लांटेशन मध्ये गांजाची लागवड होते का ? याबाबत बऱ्याच वेळा माहिती घेतली, मी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली. मात्र, तशी लागवड आढळून आलेली नाही. याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाकडे माहिती उपलब्ध असल्यास ती आम्हाला द्यावी.

परप्रांतीयांची पोलिस स्टेशनला नोंद

जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतीयांची प्रत्येक पोलीस स्टेशनला नोंद झाली पाहिजे. याबाबत मच्छिमार संघटना, पणन संघटनांची आम्ही बैठक घेऊन तशा सूचना करून नोंदी केल्या आहेत. आता वेबसाईटवर भाडेकरू व परप्रांतीयांची माहिती मालक भरु शकतात, असेही अगरवाल यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात सीसीटीव्हीसाठी चार प्रस्ताव तयार

सीसीटीव्ही करिता निधीच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर करत आहोत. जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, आंबोली हिल स्टेशन, सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्यातील महामार्ग असे चार प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

...तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ

हद्दपारी झालेल्या व्यक्तीच्या घरी भेट द्या, जर हद्दपार झालेली व्यक्ती त्याच्या निवासस्थानी आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अगरवाल यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT