सिंधुदुर्ग : पावशीत अग्नितांडव; मुंबई - गोवा महामार्गावर धुराचे लोट

चौपदरीकरणांतर्गत डेपो केलेल्या लाकडांना आग
Sindhudurg fire news
सिंधुदुर्ग : पावशीत अग्नितांडव; मुंबई - गोवा महामार्गावर धुराचे लोट
Published on
Updated on

कुडाळ : पावशी येथे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत डेपो करून ठेवलेली लाकडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ हद्दीत रस्ता दुतर्फा तोडलेल्या झाडांची लाकडे तेथे डेपो करून ठेवण्यात आली होती. या लाकडांना बुधवारी रात्री अचानक आग लागली. वार्‍याने आग भडकल्याने महामार्गावर धुराचे लोळ पसरले. धुमसत असलेली आग गुरुवारीही अधिक भडकली.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामावेळी कुडाळ तालुक्याच्या हद्दीत जुन्या हायवेच्या दुतर्फा असलेली झाडे, हायवे ठेकेदार कंपनी प्रशासनामार्फत तोडण्यात आली होती. या झाडांची लाकडे मोठमोठ्या ओंडके स्वरूपात पावशी तवटे-म्हाडेश्वरवाडी नजीक महामार्गालगतच्या जागेत डेपो करून ठेवण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत ही लाकडे पावसाळ्यात पूर्णपणे कुजली. या लाकडांच्या डेपो परिसरात गवतही वाढून ते आता उन्हात वाळले होते. या परिसराला बुधवारी रात्री 8 च्या सुमारास अचानक आग लागली. वाळलेले गवत, लाकडामुळे वार्‍याने आग काही क्षणात भडकली आणि संपूर्ण डेपोला आगीने व्यापले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे लोळ लगतच्या महामार्गावर पसरले. याचा वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागला. रात्रभर ही आग पेटत होती.

गुरुवारी सकाळी आगीचा पुन्हा भडका उडाला आणि तेथील अंतर्गत रस्त्याच्या पलिकडे असलेल्या लाकडांनाही आग लागली. दुपारपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करीत, सर्व लाकडे जळून भस्मसात झाली. लगतच्या परिसरातही आग पसरली. त्यामुळे तेथील नागरिकांची धावपळ उडाली. याची माहिती मिळताच पावशी सरपंच वैशाली पावसकर, मंडळ अधिकारी (कुडाळ) सी. डी. मसुरकर व तलाठी विद्या अरदकर यांच्यासह ग्रामस्थ संजय बोभाटे व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत, आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत असल्याने अडचणी निर्माण झाल्या. याची माहिती हायवे ठेकेदार कंपनी प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर दुपारी हायवे ठेकेदार कंपनीने पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवत, टँकरमधील पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news