कणकवली : हरकुळ बुद्रुक आणि भिरवंडे गावात नादुरुस्त वीजमीटरसह चालू वीज मीटर काढून त्याठिकाणी अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांची परवानगी न घेता हे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरचे बिल पूर्वी पेक्षा जास्त येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार असल्याने त्याबाबत महावितरणच्या अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी हरकुळ बुद्रुक व भिरवंडे गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी माजी आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व पदाधिकार्यांसमवेत कणकवली महावितरण कार्यालयात धडक दिली.
फॉल्टी मीटरच्या नावाखाली सरसकट स्मार्ट मीटर बसविले जात असतील तर हे खपवून घेणार नाही, जे चालू मीटर आहेत ते ग्राहकांच्या परवानगी शिवाय काढू नका. लोकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसवू नका, फॉल्टी मीटरची यादी आपल्याला द्या असे वैभव नाईक, सतीश सावंत यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता सौरभ माळी, उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील, अधिकारी मनोज निग्रे यांना ठणकावले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हरकुळ बुद्रुक सरपंच बंडू ठाकूर, माजी पं. स. सदस्य मंगेश सावंत, बेनी डिसोजा,अमित सावंत,मुकेश सावंत, नित्यानंद चिंदरकर, रिया म्हाडेश्वर यांच्यासंह ग्रामस्थ उपस्थित होते. स्मार्ट वीज मीटर बसविण्यासाठी अदानी कंपनीची वेगळी टीम असताना महावितरणचे काही अधिकारी महावितरणच्या वायरमनांना महिन्याला 10 स्मार्ट मीटर बसविण्यास सांगत आहेत. आणि त्याबदल्यात अदानी कंपनी प्रत्येक मीटरमागे वायरमनला 70 रु. देत आहे. ही बाब एका वायरमननेच सर्वासमक्ष सांगितल्याने यावर संताप व्यक्त करण्यात आला.
यापुढे वीज ग्राहकाला कल्पना दिल्याशिवाय स्मार्ट मीटर लावायचे नाहीत असे वैभव नाईक, सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकार्यांना सांगितले. हरकुळ बुद्रुक, भिरवंडे गावातील विज वाहिन्यांवरील झाडे तोडली नसल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे, त्यामुळे गणपती अगोदर ट्रि कटिंग झाली पाहिजे, जीर्ण पोल, वीज वाहिन्या बदला असे बंडू ठाकूर, मंगेश सावंत यांनी सांगितले.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वी पेक्षा अधिकचे बिल येत आहे. त्याचबरोबर वीज बिलामध्ये जास्तीचे डीपॉझीट आकारले जात आहे. ज्याठिकाणी 700 ते 800 रु बिल येत होते त्याठिकाणी आता 3500 रु बिल आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. आता गणेशोत्सव जवळ असताना गरीब कुटुंबे हे पैसे कुठून भरणार याबाबत ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांना विचारणा केली. त्यावर अधिकार्यांनी सरासरी युनिट नुसार बिले काढल्याचे सांगितले. मात्र त्यातील तफावत शिवसेना पदाधिकार्यांनी दाखवून दिल्यानंतर अधिकारी सारवासारव करताना दिसले.
आता बसविलेले स्मार्ट मीटर बदलता येणार नाहीत ते सिस्टीम मध्ये लॉक झाले आहेत. आणि मीटर बदलले तरी सिस्टीम स्वीकारणार नाहीसौरभ माळी महावितरण कार्यकारी अभियंता, कणकवली