सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जि. प. विशेष सभेत विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तुफान जुंपली. आधीच्या वित्त आयोगाच्या निधीचा जाब विचारत आणि डावलल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवत सभात्याग केला, तर सत्ताधाऱ्यांनी एकगठ्ठा ठराव करत १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला मंजुरी दिली.
जि. प. विशेष सर्वसाधारण सभा केंद्रीय १५ व्या वित्त आयोगाच्या २०२६-२७ च्या निधी आराखड्याला मंजुरी देण्यासाठी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली.
मात्र, सभेच्या सुरुवातीपासूनच विकासकामांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. अखेर विरोधकांच्या घोषणाबाजी आणि निषेधाच्या वातावरणात सभात्यागासह हा गोंधळ पार पडला.
सभा सुरू होताच, विरोधी गटाचे सदस्य राजन चिके यांनी आक्रमक भूमिका घेत, "आम्ही सांगितलेली कामे यादीतून का वगळली? आमच्यावरच अन्याय का? आम्ही काय पाकिस्तानातून आलोय का?" असा संतप्त सवाल केला.
यावर सत्ताधारी गटाचे रूपेश कानडे यांनी विषयपत्रिकेनुसार (अजेंडा) सभेचे कामकाज पुढे घेण्याची सूचना केली. दरम्यान विरोधी गटाचे रूपेश पावसकर, संजय नाईक, संजय गावडे आणि गंगाराम सडवेलकर यांनी आक्रमक होत, आधी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे काय झाले? त्याची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी लावून धरली.
या वादादरम्यान सत्ताधारी गटाचे सदस्य संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, दीपक नारकर आणि रूपेश कानडे यांनी विरोधकांच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला. तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीला मान्यता देत तसा ठरावही मंजूर करून घेतला. सदस्य संदेश सावंत यांनी विरोधी सदस्यांची वैयक्तिक मते नोंदवून घेण्याची सूचना केली.
मात्र, "आम्ही या सभागृहाचे कायदेशीर सदस्य आहोत, जर आमचे कोणी ऐकतच नसेल तर हे चुकीचे आहे. या दबावाच्या राजकारणाचा आम्ही तीव्र निषेध करतो," असे म्हणत विरोधी सदस्यांच्या वतीने सभागृहात 'निषेध, निषेध... निषेध असो' अशा जोरदार घोषणा देत सभात्याग करण्यात आला.
सभेदरम्यान गोंधळ सुरू असताना, आपलेच काही सदस्य जिल्हा परिषदेतील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि बदनामी करतात, हे अजिबात योग्य नाही, अशी उद्विग्न नाराजी जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केली. या विशेष सभेत विविध खात्यांचे प्रमुख व जि.प. सदस्य उपस्थित होते.