कणकवली ः सिंधुदुर्गात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार यांच्या महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजप 31, तर शिंदे शिवसेना 19 जागा आणि पंचायत समितीच्या 100 जागांपैकी भाजप 63 तर शिंदे शिवसेना 37 जागा लढविणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रस्ताव देण्यात आला असून, त्यांचेही समाधान करण्याचा प्रयत्न राहील. उमेदवारांची यादी रविवार सायंकाळपर्यंत निश्चित होऊन रात्री त्या उमेदवारांना पत्र दिले जाईल. महायुतीकडून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, अशी माहिती भाजप नेते खा. नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत खा. नारायण राणे यांनी महायुतीचे जागा वाटप केले. पालकमंत्री नितेश राणे, आ.नीलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, संजय पडते, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जि.प.च्या 50 व पं. स. च्या 100 जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला खा.राणे यांनी जाहीर केला.
यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय जागा वाटपाची माहिती खा.राणे यांनी दिली. त्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जि.प.च्या 17 जागांपैकी भाजप 11 व शिंदे शिवसेना 6 तर पं.स.च्या 34 जागांपैकी भाजप 17 व शिंदेंची शिवसेना 17 अशा समसमान जागा लढविणार आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात जि. प.च्या एकूण 15 जागांमध्ये भाजप 4 जागा तर शिंदेंची शिवसेना 11 जागा लढविणार आहे. पं.स.च्या 30 जागांपैकी भाजप 15 व शिंदे शिवसेना 15 असे समसमान वाटप करण्यात आले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील जि. प.च्या 18 जागांपैकी भाजप 16 व शिंदे शिवसेना 2 तर पं.स.च्या 36 जागांपैकी भाजप 31 व शिंदे शिवसेना 5 जागा लढविणार असल्याचे खा.राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निकालामध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून तसेच यश जि.प व पं.स निवडणुकीमध्ये मिळणार आहे. सिंधुदुर्गात महायुतीला 100 टक्के यश मिळण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. मुळातच सिंधुदुर्गात महायुतीच्या विरोधात लढायला, विरोध करायला कोणीही शिल्लक राहिलेले नाही अशी बांधणी आम्ही प्रत्येक मतदारसंघात केलेली आहे. जिल्ह्यात विरोधकांना मतदारसंघच ठेवलेला नाही. जागा वाटप निश्चित करण्यात आले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समाधान करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालाविषयी बोलताना खा.राणे म्हणाले, ठाकरे एकत्र येऊनही त्याचा काही उपयोग झाला नाही. आमच्यासारखे अनेकजण बाहेर पडल्यानेच त्यांची ही अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे हेसुध्दा काही मनापासून बाहेर पडले नाहीत तर त्यांच्यावर सुध्दा तशी वेळ आणण्यात आली अशी टीका खा.नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली.
जि.प.अध्यक्षपदाचेही ठरले
जि.प. आणि पं.स च्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवितानाच जि.प. अध्यक्षपदाचाही फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. जि.प. अध्यक्षपद भाजपला तीन वर्ष तर शिंदे शिवसेना दोन वर्ष दिले जाणार असल्याचे खा.नारायण राणे यांनी सांगितले.