

कणकवली ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कणकवलीत प्रहार भवनमध्ये खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता जिल्हा भाजप कार्यकारणीची बैठक झाली. त्यानंतर दुपारी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत खा. नारायण राणे यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत निवडणुकीतील विजयाबाबत मार्गदर्शन केले. चर्चेअंती भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
भाजप आणि महायुतीच्या बैठकांसाठी जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. भाजप जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी आ. प्रमोद जठार, अजित गोगटे, माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संदीप कुडतरकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संजना सावंत, भाग्यलक्ष्मी साटम, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, महेश सारंग, मनोज रावराणे, संतोष कानडे, भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप बैठकीनंतर दुपारी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक खा. नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी आ. प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आग्रे, काका कुडाळकर, संजय पडते, दीपलक्ष्मी पडते आदी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर खा. नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये युती न झाल्याचा फटका दोन्ही पक्षांना काही प्रमाणात बसला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत युती आवश्यक असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती झाल्यास अधिक ताकदीने लढून जिल्हा परिषदेवर सत्ता काबिज करता येईल, असा सूर व्यक्त करण्यात आला. चर्चेअंती या बैठकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.