Zilla Parishad Sindhudurg (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Zilla Parishad Election| सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचा गुलाल! प्रमोद कामत अध्यक्ष, तर दादा साईल उपाध्यक्षपदी बिनविरोध

Sindhudurg Zilla Parishad Election| प्रशासकीय राजवट संपली, लोकशाहीचे पर्व सुरू! ४ वर्षांनंतर सिंधुदुर्ग जि.प. ला मिळाले नवे नेतृत्व

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

सातव्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली असून सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे बांदा प्रभागातून निवडून आलेले प्रमोद कामत यांची अध्यक्षपदी तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी कुडाळ तालुक्यातील पावशी प्रभागातून विजयी झालेले तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.

भाजप आणि शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय दाखवत दोन्ही पदांसाठीचा उमेदवारी अर्ज एकत्रितपणे सादर केला. मात्र सहा अपक्ष सदस्य आणि ठाकरे सेनेचे तीन सदस्य मिळून जो ९ सदस्यांचा दबावगट स्थापन करण्यात आला आहे त्यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना सहभागी न होता स्वतंत्र अस्तित्व दर्शविले. किंबहुना सभागृहात बसतानाही दबावगटातील नऊही सदस्य एकत्रित बसले होते.

भाजप-शिवसेनेचे मात्र ५० पैकी ४१ इतके मोते संख्याबळ आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे यांच्यासह माजी सभापती संजय बोबडी, सावी लोके, संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ तसेच मनोज रावराणे, प्रमोद रावराणे, सुनील पारकर, प्राची इस्वलकर, शीतल दळवी, सुप्रिया वालावलकर, संतोष पारकर हे सत्ताधारी सदस्य तसेच स्वतंत्र गटातील रुपेश पावसकर, राजन चिके, संजय गावडे, सुजाता पडवळ, शिवानी नाईक, नितीन राऊळ असे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले आहे.

अध्यक्ष पदासाठी भाजपचे सावंतवाडी तालुक्यातील बांदा गटाचे सदस्य प्रमोद कामत यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील पाचशी गटाचे सदस्य तुकाराम ऊर्फ दादा साईल यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. पीठासन अधिकारी शुभांगी साठे व सहा. निवडणूक अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेना व अपक्षांच्या गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. दरम्यान दोन्ही पदांसाठी दाखल अर्ज वैध ठरले.

दुपारी ३ वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या विशेष सभेत अति. जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी शुभांगी साठे यांनी प्रमोद कामत यांची अध्यक्षपदी व दादा साईल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नव्या नेतृत्याचे स्वागत केले. सभागृहात पहिल्या रांगेत सभागृहाच्या उजव्या बाजूला ठाकरे शिवसेनेचे व अपक्ष नऊ सदस्य एकत्रित बसले होते. भाजपा व शिवसेनेचे सदस्यही रांगेत बसले होते. विशेष सभेत सदस्यांनी राजस्थानी फेटे व भगवे फेटे धारण केले होते.

विजयामुळे सत्ता निश्वित

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा महायुतीने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपने २७ जागा जिंकत सर्वाधिक कामगिरी केली, तर शिंदे शिवसेनेने एका पुरस्कृत उमेदवारासह १४ जागा मिळवल्या होत्या. अशाप्रकारे महायुतीचे एकूण ४१ सदस्य सभागृहात उपस्थित होते. दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे तीन व सहा अपक्ष सदस्यांचा एक दबावगटही सभागृहात उपस्थित होता.

पक्ष नेतृत्वाकडून आली लिफाफ्यातून नावे..!

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून उमेदवार तरवण्यासाठी सिधुदुर्गनगरी येथील भाजप कार्यालयात सोमवारी निवड प्रकियेच्या सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उमेदवारांची नावे असलेला लिफाफा उघडण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदे शिवसेनेचे विल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पक्ष नेतृत्वाकडून आलेला लिफाफा यावेळी उघडण्यात आला. त्या लिफाफ्यात अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत तर उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांची नाचे जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर उपस्थित पदाधिका-यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही नावांना पाठिंबा दर्शविला, त्यानंतर महायुतीतील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर कामत व साईल यांनी जिल्हा परिषदेत जाऊन आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सादर केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एम. नाईक उपस्थित होते.

प्रशासकीय राजवटीनंतर नवे नेतृत्व

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत यापूर्वी २०१७ साली निवडणुका होऊन सदस्य निवडून आले होते. त्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २१ मार्च २०२२ रोजी संपला. मात्र त्यानंतर विविध कारणांमुळे जिल्हा परिषद निवडणुका वेळेत घेण्यात आल्या नाहीत.

परिणामी त्या दिवसापासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. जवळपास चार वर्षे जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून चालवली गेली. अखेर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडले, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महायुतीने प्रभावी कामगिरी करत जिल्हा परिषदेत्त स्पष्ट बहुमत मिळवले.

शांततेत पार पडली निवडणूक

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोणताही विरोधी उमेदवार नसल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि जलदगतीने पार पडली. निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली. दुपारच्या विशेष सभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषदेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

महायुतीच्या सदस्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास्तती महायुतीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. दरम्यान निवडीनंतर जिल्हा परिषद जोरावर ढोल ताशाचा गजर सुरू होता, दुसरीकडे अध्यक्ष उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये चाहत्याकडून शुभेच्छांचा वर्षाय सुरू होता.

जि.प. सदस्यांना दिली ओळखपत्रे

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पुष्पगुछ देवून स्वागत केले व सर्व जि. प. सदस्य व पंचायत समिती सभापती यांना स्वतः ओळखपत्र सुपूर्त केली.

दोन पाल्यांना दिले नियुक्ती पत्र..!

लाड पांगे समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद मधील सफाई कामगारांच्या दोघां पाल्यांना नवनिर्वाचित जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.. यामध्ये श्रीमती सगिलकर व मनोहर गोसावी यांचा समावेश होता.

सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार प्रमोद कामत

माझ्या मतदार संघातील सर्व मतदारांच्या आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे मी बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. आता खा. नारायण राणे, पालकमंत्री निलेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह युतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आशीर्वादामुळे मला पहिल्याच टर्म मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करताना प्रशासनाला सहकार्य करून जिल्ह्याच्या विकासासाठी मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतले जातील. युतीचे शासन असल्याने जिल्हा परिषद साठी भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.

सर्वांच्या साथीने पारदर्शक काम करू साईल

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात आदर्शवत आहे. यापुढेही राज्यात आघाडीवर ठेवण्याबरोबरच देशात आदर्शवत राहावी यासाठी प्रयत्न केले जातील, १० वर्षे सरपंच म्हणून काम करतानाचा प्रशासकीय अनुभव निश्चितच उपाध्यक्ष म्हणून काम करताना उपयुक्त ठरेल! पहिल्या टर्ममध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करून देणाऱ्या खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. नीलेश राणे, आ. दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह माझ्या मतदार संघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि मतदारांचा मी ऋणी आहे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन पारदर्शक काम करण्याचा प्रयत्न करेन असे नवनिर्वाचित जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT