मालवण : अविवाहित युवकाच्या साधेपणाचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून त्याची १ लाख ६३ हजाराची आनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी श्रद्धा दीपक वालावलकर (रा. आरवली वेंगुर्ले) या विवाहितेला अटक करण्यात आली. तिला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी रविवारी (दि.२२) दिली. याबाबत रामचंद्र सारंग (वय २७, रा दांडी झालझुलवाडी) या युवकाने पोलिसात फिर्याद दिली होती.
फिर्यादी रामचंद्र सारंग याचा आते भाऊ पंकज मालंडकर याच्याशी श्रद्धा वालावलकर हिने सोशल मीडियाद्वारे ओळख केली. यात तिने लग्नासाठी कोण मुलगा असेल तर सांग, असे सांगितले. त्यानुसार पंकज याने रामचंद्र याला मुलीचा मोबाईल नंबर दिला. यानंतर रामचंद्र याने त्या मुलीशी संपर्क साधला असता तिने आपले नाव सारिका नारायण परब असे सांगितले. यात श्रद्धा म्हणजेच खोटे नाव सारिका हिने तुझ्याशी मी लग्न करण्यास तयार असल्याचे रामचंद्रला सांगितले. यादरम्यान तिने त्याला दोन दिवसांनी परत कॉल करून मी रत्नागिरी येथे नर्स म्हणून काम करत आहे. त्यामुळे लग्न करायचे असल्याने रत्नागिरी येथून कुडाळला बदली करावी लागेल, असे सांगून ऑनलाइन ५० हजार रुपये मागून घेतले. त्यानंतर लग्नासाठी कपडे तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी १ लाख १३ हजार असे टप्प्याटप्प्याने ऑनलाईन मागून घेतले. हा प्रकार १४ मे ते १६ जून या कालावधीत घडला.
रामचंद्र सारंग याने तिला आपण लग्न कधी करूया, असे विचारले असता तिने ८ जून रोजी लग्न करूया, असे सांगितले. त्यानुसार रामचंद्र सारंग याने लग्नाची पत्रिका छापून ती नातेवाईकांमध्ये वाटली. यात ४ जून रोजी सारिका हिने आपल्या काकांचे निधन झाल्याने आपण लग्न करू शकत नाही. लग्नाची पुढील तारीख निश्चित कर, असे सांगितले. त्यानुसार १९ जून ही लग्नाची तारीख ठरली. मात्र त्यावेळेसही तिने मासिक पाळी असल्याने आपण लग्न करू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतरही ती लग्नास टाळाटाळ करत असल्याने अखेर रामचंद्र सारंग याने येथील पोलीस ठाण्यात आपली आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर, सहाय्यक उपनिरीक्षक आर. पी. खोबरेकर, सुशांत पवार महादेव घागरे यांच्या पथकाने शनिवारी (दि.२१) रात्री वेंगुर्ले भटवाडी येथून तिला ताब्यात घेतले.
तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता श्रद्धा वालावलकर हिने सारिका परब हे नाव फिर्यादी रामचंद्र सारंग याला सांगितले तसेच त्याला जो फोटो पाठविला होता, तो अन्य तरुणीचा असल्याची माहिती मिळाली. श्रद्धा वालावलकर या विवाहितेने जिल्ह्यात दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी या तालुक्यातही अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी दिली.