

रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून नंतर लग्नास नकार देत पुणे येथील एका महिला पोलिस कर्मचार्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस काँस्टेबलला निलंबित करण्यात आले. त्याच्यावर पुणे येथील वाघेली पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.२४) गुन्हा दाखल करण्यात आला.अमोल मांजरे असे निलंबन करण्यात आलेल्या पोलिस काँस्टेबलचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस भरतीसाठी तो ट्रेनिंग घेत असलेल्या एका अॅकॅडेमीत त्याची तक्रारदार महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर सन २०१८ मध्ये या दोघांचीही पोलिस भरतीत नियुक्ती झाली. अमोल रत्नागिरीत तर ती महिला पुणे येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्यात भेटी-गाठी वाढू लागल्या. त्यानंतर अमोलने त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले व नंतर लग्नास नकार दिला. तिने अमोलकडे लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी मुलगी पाहिलेली असल्यामुळे मी तुझ्याशी लग्न करु शकणार नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत पुणे येथील वाघेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत रत्नागिरी पोलिस विभागाने अमोल मांजरेची प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबन केले आहे. त्याची प्राथमिक चौकशी रत्नागिरी पोलिसच करणार असून या गुन्ह्याचा तपास पुणे-वाघेली पोलिस ठाणे करणार आहे.