ओरोस : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 29, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या कालावधीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.29) गडगडाटी पावसासह विजा चमकण्याची व ताशी 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामानातील या प्रतिकूल बदलांमुळे समुद्र कमालीचा खवळला असून किनार्यांवर जोरदार लाटा आदळत आहेत. यामुळे मासेमारी ठप्प झाली असून बंदर विभागानेही मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.30) 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून वार्याच्या वेग 60 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यांत्रिक तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी या कालावधीत खाडी अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठेवावीत.
समुद्र खवळल्याने किनार्याला बसणार्या जोरदार लाटांच्या तडाख्याने किनारपट्टी खचत असून काही ठिकाणी किनार्यावर घळ पडत आहेत, यामुळे पर्यटकानीही या कालावधीत समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन बंदर विभागाने केले आहे.
दरम्यान गेले दोन दिवसांपासून समुद्र खवळला असून खबरदारी म्हणून मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका खाडी व समुद्र किनारी सुरक्षीत बांधून ठेवल्या आहेत. विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले, शिरोडा, निवती आदी सर्वच बंदरांमधून मासेमारी नौका नांगरून ठेवल्याचे चित्र आहे.