आचरा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देताना उपसरपंच वकील समृद्धी आसोलकर, संजना रेडकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित  Pudhari
सिंधुदुर्ग

Malvan Teacher Death | वायंगणीतील शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूचे सत्य समोर आणा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूला एक महिना उलटूनही सत्य समोर आलेले नाही

पुढारी वृत्तसेवा

Wayangani Malvan Teacher Death Case

आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील २८ वर्षीय विवाहित शिक्षिका अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यूला एक महिना उलटूनही सत्य समोर आलेले नाही. त्यामुळे गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी निवेदनही सादर केले.

या घटनेमुळे वायंगणी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर, सदस्य सचिन रेडकर, संजना रेडकर, मंजिरी राणे, राजीव सावंत, महादेव खोत तसेच अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

तपासाची गती मंदावल्याची खंत

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित शिक्षिका अत्यंत कर्तव्यदक्ष असून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. त्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अध्यापन करत होत्या आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत असत. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेनंतर सुरुवातीच्या चार ते पाच दिवसांत डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक तपास तसेच सीआयडी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला होता. मात्र त्यानंतर तपासाची गती मंदावल्याचे दिसून येत असून आजपर्यंत हा मृत्यू की हत्या, याबाबत स्पष्टता आलेली नाही.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या प्रकरणातील सत्य समोर न आल्यास ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे. मृत शिक्षिकेच्या पश्चात लहान मूल असून त्याच्या भविष्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक तपासाची मागणी करण्यात आली आहे.

वेळबद्ध चौकशीची मागणी

या प्रकरणात तातडीने वेळबद्ध तपास करून ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ सादर करावा, तपासावर सतत देखरेख ठेवावी आणि महिला सुरक्षेचा गंभीर मुद्दा म्हणून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी १५ दिवसांत तपासात ठोस निष्कर्ष काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT