Sindhudurg crime news | खून आर्थिक कारणातून की अन्य कारण!

खुनाबाबत अनेक तर्कवितर्क : सुशांत दळवी खून प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास
Sindhudurg crime news
Sindhudurg crime news
Published on
Updated on
Summary
  • खून करून मृतदेह फरफटत नेला

  • शिकारीला जातो म्हणून गेले होते

  • श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब टीमकडून तपास

  • पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

कणकवली : कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी (४०) यांच्या खुनाच्या घटनेने कणकवलीसह कळसुलीमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला? शिकारीला जातो म्हणून सुशांत दळवी घरातून गुरुवारी रात्री बाहेर पडले होते अशी चर्चा होती, मग त्यांचा खून कसा झाला? सोबत असलेल्या मुकादमासोबत आणखी कोण साथीदार होते का? त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीनजीक मोहनमळा परिसरात आणून का टाकला? व्यावसायिक कारणातून खून झाला का, की अन्य कोणते कारण? याबाबतचा कसून तपास पोलीस करत आहेत.

सुशांत दळवी हे कळसुली गावचे सुपुत्र असून ते गेल्या काही वर्षांपासून शासकीय ठेकेदार म्हणून तर अलिकडे काही वर्षे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात होते. कणकवलीमध्ये ते कुटुंबीयांसह राहत असत. गावच्या धार्मिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. मराठा समाजाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांची बोर्डवे येथे गणपती मूर्ती शाळा असून गुरुवारी रात्री ८ वा. च्या सुमारास ते त्याठिकाणी रंग धवून गेले होते. मात्र ते पुन्हा कणकवलीत आले. रात्री उशिरा ते घरातून शिकारीला जातो असे सांगून बाहेर पडले अशी चर्चा होती. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह गोळी झाडलेल्या स्थितीत कणकवलीतील मोहनमळा परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली.

पोलीस यंत्रणेसह शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी आ. वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर, वागदे सरपंच संदीप सावंत, अतुल दळवी यांच्यासह अनेकजण घटनास्थळी पोहोचले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलीस अधीक्षक नवोमी साटम, कणकवलीचे डीवायएसपी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे, उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह स्थानिक पोलीस आणि एलसीबीची टीम यांनी घटनास्थळी तपास सुरू केला.

गुरुवारी रात्री असे नेमके काय घडले?

सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेले सुशांत दळवी यांचा खून झाल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले. गुरुवारी रात्री असे नेमके काय घडले की त्यांचा खून झाला? रात्री उशिरा ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. सुशांत दळवी हे बांधकाम व्यवसायात असल्याने अनेकांशी त्यांचे संबंध होते. त्यामुळे आर्थिक कारणातून कोणी त्यांचा काटा काढला का? की अन्य कोणते कारण? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांचा मुकादम अमर कदम याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडूनच त्या रात्री नेमके काय घडले? याचा उलगडा होणार आहे. सुशांत यांना शिकारीचा छंद होता. मग ते शिकारीला गेले असताना त्यांच्यावर बंदूकची गोळी झाडली गेली का? अमर कदम हा एकट्याने हे कृत्य करू शकतो का? कारण सुशांत दळवी हे अंगाने मजबूत होते. त्यामुळे हे कृत्य एकट्याने करू शकत नाही. खुन्यासोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

खुनाचे खरे कारण लवकरच पुढे येण्याची शक्यता

पोलीस या खुनाचा कसून तपास करत असून खुनाचे खरे कारण लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्राथमिक तपासात जरी मुकादमाला अटक करण्यात आली असली तरी खुनामागे खरे गुन्हेगार पुढे येण्याची आवश्यकता आहे. यामध्ये काही संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मृतदेह फरफटत नेला : चप्पल फेकली

ज्याठिकाणी मोहनमळा परिसरात सुशांत दळवी यांचा मृतदेह आढळला त्यापासून अलिकडे २५ ते ३० फुटावर रक्त सांडले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी त्यांचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. मृतदेह तेथून फरफटत नेऊन उताण्यास्थितीत टाकण्यात आला. दुचाकी किंवा चारचाकीने त्यांना तिथे आणण्यात आले असावे असाही अंदाज आहे. मृतदेहानजीक एक चप्पल तर दुसरी चप्पल झाडावर आढळल्याचे सांगितले जाते.

मृतदेहाच्या डोक्यावर आणि पाठीमागे जखम

उताण्यास्थितीत आढळला सुशांत दळवी यांचा मृतदेह रक्ताळलेल्या स्थितीत होता. त्यांच्या डोक्यावर दोन भुवयांच्यामध्ये गोळीची जखम होती. नाकातून आणि जखमेतून चेहऱ्यावर रक्त सांडले होते. अंगावर चॉकलेटरी, आकाशी पट्टे असलेला चेकचा शर्ट होता, तर नेव्ही ब्लू रंगाची ट्रॅक त्यांनी घातलेली होती. दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर होते. शर्ट एका हाताच्या बाजूने रक्ताने माखलेला होता.

अगदी जवळून झाडली गोळी

सुशांत दळवी यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला कपाळाला अगदी जवळून गोळी झाडलेली आहे. लांबून गोळी झाडली असती तर ती आरपार गेली असती. एक गोळी त्यांच्या डोक्यात होती. ती गोळी नेमकी रिव्हॉल्व्हर, पिस्तुलाची की बंदूकची हे स्पष्ट होण्यासाठी मृतदेह पोलिसांनी सीपीआर कोल्हापूरला पाठवला आहे.

श्वान पथकाकडून तपास

खुन्याचा मार्ग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र खुनी गाडीतून गेल्याने श्वान त्याच परिसरात घुटमळले. फॉरेन्सिक लॅबकडून रक्त, मातीचे नमुने घेण्यात आले. अन्य कोणत्याही वस्तू आढळल्या की कसे हे पोलिसांनी सांगितले नाही. मृतदेहाच्या अंगावर काही सोने होते का? हे समजू शकले नाही परंतु त्यांच्याकडील दोन मोबाईल पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून कॉल रेकॉर्ड व अन्य बाबींचा तपास पोलीस करणार आहेत. कणकवलीचे डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांची टीम तपास करत आहेत. सुशांत दळवी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. कळसुली हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. जे. जे. दळवी यांचे ते सुपुत्र होत. सुशांत दळवी यांच्या खुनामुळे कळसुलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news