वेंगुर्लेमध्ये ठाकरे सेनेची स्वबळाची तयारी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg politics : वेंगुर्लेमध्ये ठाकरे सेनेची स्वबळाची तयारी

संदेश निकम नगराध्यक्षपदाचे उमेदवार; आघाडीबाबत प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ला ः आजच्या बाजारू राजकारणात आपण कोकणात शिवरायांचे निष्ठावंत मावळे आहोत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणात सर्वांच्या सहकार्याने उभी केलेली शिवसेना संघटना यामुळे आपला पक्ष अगदी ग्रामीण लेव्हलवरही भक्कम आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुम्ही मशाल हाती घेण्याचे जे धारिष्ट्य दाखविले आहे, ते अभिमानास्पद आहे. त्यामुळे येणार्‍या नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्या ठाकरे शिवसेना पक्षाचा विजय निश्चित आहे, असे वक्तव्य माजी खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ला येथे केले.

वेंगुर्ला ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी खा. विनायक राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक झाली. ठाकरे शिवसेनेकडून थेट नगराध्यक्ष म्हणून संदेश प्रभाकर निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले. तसेच 17 उमेदवाराची निश्चिती करण्यात आली. या बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा संघटिका जान्हवी सावंत, सौ. परब, मंदार सिरसाट, तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक व संजय गावडे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, विवेक कुबल, विकी केरकर, वाल्मिकी कुबल, सुमन निकम, अजित राऊळ, तुषार सापळे, साक्षी चमणकर, कोमल सरमळकर, संदिप पेडणेकर, पंकज सिरसाट आदीसह उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

वेंगुर्लेत आघाडीबाबत आजही आशावादी

खा. राऊत पुढे म्हणाले, वेंगुर्ला तालुक्यात आघाडीबाबत आजही आशावादी आहोत व त्यासाठी प्रयत्न करतोय. काँग्रेसचे उमेदवार विलास गावडे यांच्याबद्दल विरोध नाही. परंतु त्यांना गरज नसेल तर आपण स्वबळावर पूर्ण ताकदीने लढू. प्रचाराला अवघे 10 दिवस मिळत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा, विचार आणि आपले पक्षाचे कार्य, आपले मशाल चिन्ह जनतेसमोर न्या. मशाल चिन्हावर तुम्ही लढण्यास तयार झालात, हे पुरेसे आहे. संदेश, तुषार, अजित या त्रिकुटसह अस्मिता राऊळ यांनी आदर्श उपनगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेवर विजय मिळविण्यासाठी आतापासूनच गती घ्या. त्यासाठी आपले, जिल्हाप्रमुख पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य राहील, असेही ते म्हणाले. श्री. दुधवडकर, संदेश निकम, यशवंत परब, नीलेश चमणकर यांनी विकासाच्या आवश्यक मुद्याबाबत मनोगत व्यक्त केले. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. शैलेश परुळेकर यांनी आभार मानले.

आघाडीबाबत सकारात्मक चर्चा नाही

वेंगुर्ला तालुक्यात आघाडीबाबत सकारात्मक चर्चा नाही. त्यामुळे आघाडी न झाल्यास स्वबळावर लढू. दरम्यान आघाडी झाली तरी मेरिटनुसार आपल्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराची मागणी थेट नगराध्यक्ष साठी राहील, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT