वेंगुर्ले : वेंगुर्ले एस.टी आगाराला येत्या ८ दिवसात ५ नवीन बसेस उपलब्ध होणार आहेत. वेंगुर्ले एस.टी डेपोला बसेसची कमतरता जाणवत असल्याने माहीमचे आमदार महेश सावंत यांनी पाठपुरावा केला होता. याला प्रतिसाद देत उपमहाव्यवस्थापक वाहतूक मुंबई सेंटर यांच्याकडून बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मुंबई माहीम मतदार संघांचे आमदार महेश सावंत यांनी सोमवारी (दि.५) वेंगुर्ले एसटी डेपोला भेट देऊन आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्याशी बसस्थानकावरील विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी येथे सुरू असलेल्या डेपोच्या व आगारातील कामाची पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार सेना ( शिवसेना उद्धव ठाकरे) वेंगुर्ला पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांच्यासमवेत बैठकीत सूचना केल्या. तसेच येथे सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत त्यांना माहिती दिल्यावर त्यांनी संबंधित खात्याला त्वरित सूचना केल्या. यावेळी चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना त्यांनी आगार व्यवस्थापक यांना केल्या. यावेळी वेगुर्ले आगारात बसेसची कमतरता असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत बसेसबाबत पाठपुरावा केला. यावेळी उपमहाव्यवस्थापक वाहतूक मुंबई सेंटर यांच्याकडून ५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, महाराष्ट्र एस टी कामगार सेना विभागीय जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उमेश नाईक, अध्यक्ष उदय चिंचकर, आगार सचिव विजय सोनवणे, कार्याध्यक्ष नारायण होळकर, खजिनदार विवेक नवार, विभागीय सचिव भगवान धुरी, अन्य सदस्य, ठाकरे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.