वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी होणार चौरंगी लढत! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी होणार चौरंगी लढत!

नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

अजय गडेकर

वेंगुर्ला ः वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक 2025 ची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहे. नगरपरिषदेसाठी भाजपा, शिवसेना, ठाकरे शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस हे 4 राजकीय पक्ष आमने-सामने येणार आहेत. सहाजिकच वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत अपेक्षीत असली, तरी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतरच या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 10 प्रभागांतून 10 हजार 115 मतदार असून, या 4 पक्षांमधून कोणता उमेदवार सर्वाधिक मताधिक्य घेऊन नगराध्यक्षपदाचा विजयी मुकुट परिधान करतो याची उत्सुकता आहे.

थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले होते. दिलीप लक्ष्मण गिरप (भाजपा), नागेश मोहन गावडे (शिवसेना), संदेश प्रभाकर निकम (उद्धव ठाकरे शिवसेना), सोमनाथ वसंतराव टोमके (अपक्ष), बुधाजी बाबुराव येरम (शिवसेना), विनायक सदानंद गवंडळकर (भाजपा), विलास प्रभाकर गावडे (राष्ट्रीय काँग्रेस) व नंदन मेघ:श्याम वेंगुर्लेकर (अपक्ष) असे एकूण 8 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी विनायक गवंडळकर, बुधाजी येरम यांचे 2 अर्ज अवैध ठरले असून, थेट नगराध्यक्षसाठी 6 उमेदवार रिंगणात असणार आहेत.

भाजपकडून दिलीप गिरप सलग दुसऱ्यांदा रिंगणात

भाजपने माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांना सलग दुसऱ्यांदा संधी दिली आहे. मागील थेट निवडणुकीत सुमारे 650 चे मताधिक्य घेत ते विजयी झाले होते. भाजपने 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून विनायक उर्फ सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, शीतल आंगचेकर या 3 जुन्या चेहऱ्यांना संधी दिली असून उर्वरित 17 नव्या दमाचे उमेदवार देऊन शत-प्रतिशत भाजपा साठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपच्या रणनीतिकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेनेचे उमेदवार रिंगणात

शिंदे शिवसेना स्थापन झाल्यानंतर गेल्या 3- 3.5 वर्षात शिवसेनेने संपूर्ण शहरात आपले भक्कम जाळे विस्तारले आहे. शिवाय आ. दीपक केसरकर यांचा सततचा संपर्क व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व राजापूरचे आमदार भैय्या सामंत यांचे वेंगुर्ले हे ‌‘होम टाऊन‌’ असल्याने शहरात शिवसेनेची ताकदही लक्षणीय आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक उमेश येरम, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, सुरेंद्र चव्हाण हे प्रमुखे उमेदवार रिंगणात आहेत.

ठाकरे शिवसेनेतर्फे संदेश निकम रिंगणात

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांना संधी देण्यात आली आहे. श्री निकम हे 5 टर्म नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्यासह माजी शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेविका सुमन निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, विवेक कुबल व अन्य उमेदवार नव्याने रिंगणात आहेत. या पक्षाला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कितपत साथ लाभते, हे महत्वाचे आहे.

राष्ट्रीय काँग्रेसतर्फे विलास गावडे रिंगणात

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याची हिंमत केली असून, उद्योजक व काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास प्रभाकर गावडे थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत, कृतिका कुबल, महेश डिचोलकर हे सलग दुसऱ्यांदा नगरसेवक पदांसाठी रिंगणात उतरले आहेत. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने एकही उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने तीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

दोन अपक्ष उमेदवार रिंगणात

भाजपचे पदाधिकारी असलेले सोमनाथ वसंतराव टोमके व शहर विकास आघाडीतर्फे ॲड. नंदन वेंगुर्लेकर हे थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. एकंदरीत वेंगुर्ला नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षसाठी चौरंगी लढत अपेक्षित असली तरी भाजपा - शिवसेना यांचे तगडे उमेदवार पाहता त्यांच्यातच खरी चुरस पाहण्यास मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. विलास गावडे व संदेश निकम यांनी यावेळी ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली असून दोन्ही पक्षांकडून राज्यस्तरीय नेते निवडणूक प्रचारासाठी वेंगुर्ला शहरात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT